द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान

द्रौपदी मुर्मूनवी दिल्ली – द्रौपदी मुर्मू सोमवारी भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत. सोमवारी सरन्यायाधीश एन. रमण्णा यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी राजभवनात पोहोचून मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. ‘मला मिळालेले राष्ट्रपतीपद हे माझे वैयक्तिक यश नसून भारतातील प्रत्येक गरीबाचे यश आहे. ओडीशाच्या एका दुर्गम आदिवासी गावातून प्रवास सुरू झालेली आणि जेथे प्राथमिक शिक्षण घेणेही स्वप्नवत होते अशा ठिकाणाहून आलेली मुलगी देशाची राष्ट्रपती बनते. हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताचे मोठेपण आहे’, असे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यावर मुर्मू यांनी आपल्या भाषणात भारतातील लोकशाही प्रणालीबाबत गौरवोद्गार काढले. जगभरातून राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी शुभेच्छा संदेश येत आहेत.

भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी मुर्मू यांचा शपथविधी पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातून आलेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या आहेत. ओडिशातील संथाळ या आदिवासी समुदायातून आलेल्या मुर्मू यांनी सोमवारी शपथविधीच्या वेळीही या संथाळ समुदायामध्ये वापरली जाणारी पारंपारीक साडी नेसली होती. गुरुवारी 21 तारखेला राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली होती. देशातील आमदार व खासदारांची 6 लाख 73 हजार मूल्याची 60 टक्के मते मिळवून मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी निवडल्या गेल्या होत्या. त्यांची निवड याआधीच जवळजवळ निश्चित मानली जात होती. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी समारोहाचे आयोजन करीत त्याच्या निवडीचा जल्लोष साजरा करण्यात आला.

सामान्य गरीब भारतीयांनी पाहिलेली स्वप्ने पुर्णही होऊ शकतात, माझी राष्ट्रपतीपदासाठी झालेली निवड याचा पुरवा असल्याचे यावेळी मुर्मू म्हणाल्या. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असताना अशा काळात माझ्याकडे ही जबाबदारी आहे. हा काळ नव्या संकल्पाचा आहे, असे मुर्मू यांनी अधोरेखित केले. देशाच्या स्वातंत्र्यात बलिदान देणाऱ्या, यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी उजळा दिला.

तसेच स्वतंत्र भारतात जन्माला आलेली आपण पहिली राष्ट्रपती असल्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. मात्र स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आपल्याला अमृत महोत्सवी काळात जलदगतीने काम करावे लागेल. पुढील 25 वर्षात देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पुर्ण होतील या काळात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी विकासाची कास महत्त्वाची ठरेल. मात्र कर्तव्याची जाणीव ठेवून सामुहिक प्रयत्नातून हा विकास साधायला हवा, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. ‘मो जीवन पछे नर्के पड़ी थाउ, जगत उद्धार हेउ’ या काव्यपंक्तीतून त्यांनी आपले ध्येय अधोरेखित केले. जगाच्या कल्याणासाठी काम करीत राहणे हे स्वत:च्या हितापेक्षा कितीतरी मोठे आहे, असा या काव्यपंक्तीचा अर्थ उलगडून सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

दरम्यान, राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यावर द्रौपदी मुर्मू यांच्यावर देशविदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदी विराजमान होणे सामान्य भारतीयांसाठी, तळागाळातील जनतेसाठी ऐतिहासिक क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि रशियामध्ये संबंध मुर्मू यांच्या कार्यकाळात अधिक समृद्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चीनचे राष्ट्रध्यक्ष शि जिनपींग यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले असून मुर्मू यांच्या कार्यकाळात परस्पर विश्वास, सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा जिनपींग यांनी व्यक्त केली. मालदीव, नेपाळ व श्रीलंकेच्या नेतृत्त्वानेही राष्ट्रपती मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

leave a reply