भूमध्य समुद्रातील इस्रायलच्या इंधनक्षेत्रावर हिजबुल्लाहकडून ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न

भूमध्य समुद्रातीलजेरूसलेम, – भूमध्य समुद्रातील नैसर्गिक इंधनसाठ्याचा वाद आंतरराष्ट्रीय समुदायच्या मध्यस्थीने सोडविण्याची तयारी लेबेनॉनच्या सरकारने केली होती. पण या देशातील हिजबुल्लाहच्या कारवाईने या वादाचे तणावात रुपांतर झाले आहे. भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ या इंधनवायू क्षेत्रात हिजबुल्लाहच्या तीन ड्रोन्स रवाना केले. आधीच अलर्ट असलेल्या इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी हिजबुल्लाहचे तीनही ड्रोन्स हाणून पाडले. यासाठी इस्रायलने एफ-16 लढाऊ विमान आणि बराक-8 क्षेपणास्त्रांचा वापर केला. दरम्यान, हे ड्रोन्स रवाना करून हिजबुल्लाहने इस्रायलला इशारा दिल्याचा दावा स्थानिक विश्लेषक करीत आहेत.

भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ हे इंधनवायूने समृद्ध क्षेत्र आहे. इस्रायलच्या हैफा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सागरी क्षेत्रात 1.7 ट्रिलियन क्यूबिक फिटहून अधिक इंधनवायूचा साठा आहे. इंधनवायूचा हा साठा आपल्या सागरी क्षेत्रात असल्याचा दावा इस्रायल व लेबेनॉन करीत आहे. इस्रायलने कारिश क्षेत्रातील इंधनवायूचे उत्खनन करण्यासाठी ब्रिटीश कंपनीसह करार केला होता.

गेल्या महिन्यात कारिश क्षेत्रातील इंधन उत्खननासाठी ब्रिटनचे जहाज देखील दाखल झाले होते. यानंतर लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायलला धमकावले होते. लेबेनॉनच्या इंधनसाठ्याची लूट करणाऱ्या इस्रायलला रोखण्यासाठी आपल्याकडे सारे पर्याय उपलब्ध असून इस्रायलने याआधी कधीही अनुभवले नसेल इतके जबर नुकसान सोसावे लागेल, अशी धमकी नसरल्लाने दिली होती.

भूमध्य समुद्रातीलत्यानंतर अवघ्या महिन्याभरात हिजबुल्लाहने कारिश क्षेत्रात तीन ड्रोन्स रवाना केले. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने टेहळणीसाठी ड्रोन्स रवाना केले होते. तसेच या ड्रोन्सनी इस्रायलच्या सागरी क्षेत्रात प्रवेश करण्याआधीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. इस्रायलच्या एफ-16 लढाऊ विमानाने यातील एक ड्रोन उद्ध्वस्त केले. तर इतर दोन ड्रोन्स पाडण्यासाठी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या इस्रायलच्या विनाशिकेने बराक-8 क्षेपणास्त्रे डागली.

कारिश इंधनक्षेत्रात घुसखोरी करून इस्रायलला आव्हान देण्याचा प्रयत्न हिजबुल्लाहने केला होता. पण इस्रायलचे लष्कर, नौदल आणि हवाईदल हिजबुल्लाहच्या कुठल्याही आव्हानासाठी तयार असल्याची घोषणा इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने केली. इस्रायलला धमकावणाऱ्या हिजबुल्लाहकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

दरम्यान, हिजबुल्लाहकडे क्षेपणास्त्रांचा मोठा साठा असल्याचे इस्रायलने म्हटले होते. याच्या सहाय्याने हिजबुल्लाह इस्रायलवर दिवसाकाठी हजार क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवू शकतो, याची इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायाला आठवण करून दिली होती. तसेच हिजबुल्लाहविरोधात युद्धाची तयारी असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे.

तर गेल्याच आठवड्यात हिजबुल्लाह प्रमुख नसरल्ला आणि गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हनिया यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलच्या इंधनक्षेत्रात ड्रोन रवाना केल्याचे इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत. त्यामुळे हमास व हिजबुल्लाहने एकत्र येऊन इस्रायलविरोधात मोठा कट आखल्याची शक्यता इस्रायली माध्यमे वर्तवित आहेत.

leave a reply