भारताच्या ‘तेजस’ विमानांना मलेशियाची पहिली पसंती

-लवकरच वाटाघाटी सुरू होण्याचे संकेत

नवी दिल्ली – गेल्या सात वर्षांमध्ये भारताने 38 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्यांची निर्यात केली आहे. आत्तापर्यंत शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार असलेला भारत लवकरच शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला होता. काही आठवड्यांपूर्वी फिलिपाईन्सने भारताबरोबर ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीसंदर्भात करार केला. तर आता मलेशिया भारताकडून तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी उत्सूक आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि रशियाच्या लढाऊ विमानांच्या स्पर्धेत मलेशियाने भारताच्या तेजसला पसंती दिली आहे.

Tejas2आत्तापर्यंत भारतीय बनावटीची पिस्तुलं, रायफल्स यांना विदेशात मागणी होती. पण गेल्या काही वर्षांपासून भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने आणि विनाशिकांना मोठी पसंती मिळत आहे. यामध्ये ‘तेजस‘ या लढाऊ विमानाचे सर्वच स्तरातून कौतूक सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये तेजसला विदेशी लष्करी अधिकारी आणि विश्लेषकांनी पसंती दिली होती. प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेले तेजस इतर देशांच्या याच श्रेणीतील लढाऊ विमानांपेक्षा सरस असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला होता.

आग्नेय आशियाई तसेच आखाती आणि लॅटीन अमेरिकी देशांकडूनही तेजसच्या खरेदीसाठी विचारणा सुरू असल्याचे दावे केले जात होते. पण यासंबंधी कुठल्याही देशाचे नाव घेतले जात नव्हते. पण मलेशिया लवकरच तेजसची खरेदी करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड-एचएल’चे अध्यक्ष आर. माधवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियाचे वरिष्ठ अधिकारी लवकरच भारतात दाखल होत आहेत.

चीनचे जेएफ-17, दक्षिण कोरियाचे एफए-50 आणि रशियाच्या मिग-35 लढाऊ विमानांपेक्षा मलेशिया भारताच्या ‘तेजस’ विमानांच्या खरेदीसाठी उत्सूक आहे. चीनचे लढाऊ विमान स्वस्त असले तरी तेजसच्या तोडीस नसल्याचा दावा केला जातो.

leave a reply