‘डीआरडीओ’ने तयार केलेले औषध १२ मे पासून बाजारात उपलब्ध होणार

- ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांची माहिती

औषधनवी दिल्ली – भारतातील कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाचे सिद्ध होईल, असा दावा करण्यात येत असलेले ‘२-डीजी’ हे औषध १२ मे पासून बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, अशी माहिती ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांनी दिली आहे. रुग्णांच्या शरीरात विषाणूचा फैलाव रोखून हे औषध रुग्णांना लवकर बरे करू शकेल. तसेच रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरताही यामुळे कमी होईल, असे निष्कर्ष चाचण्यांमधून निघाले आहेत. शनिवारी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या औषधाला परवानगी दिल्यावर हे औषध बाजारात कधी उपलब्ध होईल, असे प्रश्‍न विचारले जात होते. या पार्श्‍वभूमीवर ‘डीआरडीओ’ अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी हा खुलासा केला आहे.

Advertisement

‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ या (आयएनएमएएस) आपल्या प्रयोगशाळेत डीआरडीओने विकसित केलेल्या ‘२-डिऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) या औषधामुळे कोरोना विरोधातील लढाईला बळ मिळेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. डॉ. रेड्डीज या कंपनीकडून या औषधाचे उत्पादन घेतले जाणार आहे. या औषधाचे तिनही टप्प्यातील चाचण्यांमधून जे निष्कर्ष निघाले आहेत, त्यातून सर्वाच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. अशा स्थितीत हे औषध लवकरात लवकर बाजारात उपलब्ध व्हावे अशी मागणी होत होती. मात्र हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास महिनाभर तरी लागेल, असे काही तज्ज्ञांनी म्हटले होते.

पण रविवारी ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला. १२ मे पासूनच या औषधाचा पुरवठा बाजारात होण्यास सुरूवात होईल. सुरुवातीला कमी डोस बाजारात येतील. त्यामुळे सुरुवातीला सर्वत्र लगेच उपलब्ध होणार नाही. १० हजार डोस या दोन दिवसात बाजारात येणार असल्याचे रेड्डी म्हणाले.

हे औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता कमी करण्यास मदत मिळणार असल्याने देशातील ऑक्सिजनची मागणीही यामुळे कमी करण्यास मदत मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे, असे रड्डी यांनी स्पष्ट केले.

leave a reply