मालदीवजवळच्या सागरी क्षेत्रात चीनच्या रॉकेटचे अवशेष कोसळले

रॉकेटचे अवशेषवॉशिंग्टन – चीनने प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचे अवशेष अखेरीस मालदीवनजिकच्या सागरी क्षेत्रात कोसळले. २९ एप्रिल रोजी चीनने हे रॉकेट प्रक्षेपित केले होते. पण नियंत्रण सुटल्याने याचे अवशेष पृथ्वीवर आदळण्याचा धोका निर्माण झाला होता. अमेरिका व युरोपिय देशांच्या यंत्रणा यावर लक्ष ठेवून होते. मात्र सागरी क्षेत्रात कोसळल्याने मोठी हानी टळली आहे. यानंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चीनला या अपयशासाठी धारेवर धरले.

चीनच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी हे रॉकेट मालदीव नजिकच्या सागरी क्षेत्रात कोसळले. यामुळे हानी झालेली नाही, असे सांगून चीन आपला बचाव करीत आहे. पण चिनी रॉकेटच्या या अपयशी प्रक्षेपणावर अमेरिकेच्या नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांनी सडकून टीका केली. अवकाश मोहिमा राबविणार्‍या देशांकडून आपण प्रक्षेपित केलेले रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येऊन जमिनीवर कोसळणार नाही, याची दक्षता घेणे अपेक्षित असते. पण याबाबतचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जा व मानक पाळण्यात चीन अपयशी ठरला, असे बिल नेल्सन म्हणाले.

अवकाश मोहिमा राबविणार्‍या देशांनी जनतेच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी न घेणे हा फार मोठा बेजबाबदारपणा ठरतो, असे सांगून नेल्सन यांनी चीनच्या या अपयशावर नेमके बोट ठेवले. चीनचे सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने या प्रकरणी चीनवर विनाकारण टीका केली जात असल्याचा कांगावा केला. प्रक्षेपित केले जाणारे प्रत्येक रॉकेट कोसळण्याचा धोका असतोच. पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापलेला आहे, त्यामुळे आत्तापर्यंत रॉकेट कोसळून हानी झाल्याचे उदाहरण नाही, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला.

असे असतानाही अमेरिकी माध्यमे चीनवर या प्रकरणी टीका करीत आहे. अल्पावधित चीनने अवकाश संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती पाश्‍चिमात्यांना सहन होत नाही. म्हणूनच मत्सरापोटी त्यांच्याकडून ही टीका केली जात आहे, त्यामागे चीनविरोधी राजकारण असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्सने केला आहे. अमेरिका जगभरात चीनच्या या अपयशाचा गाजावाजा करून त्याकडे लक्ष वेधत आहे. आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात जावे, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. पण अमेरिकेच्या या प्रचाराला चीनने उत्तर देण्याची गरज आहे. म्हणूनच चीनने या मोहिमेबाबतची सारी माहिती व तपशील जगजाहीर करावे, असा सल्लाही ग्लोबल टाईम्सने चीनच्या सरकारला दिला आहे.

leave a reply