कोरोना’मुळे मुंबई शेअर बाजार जबरदस्त कोसळला- निर्देशांक ४ हजार अंकांची घसरण

गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी बुडाले

मुंबई – सोमवारचा दिवस मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासातील भीषण दिवस ठरला. ‘कोरोना’ विषाणूमुळे भारतात २५ राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती असताना याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांच्या भयाने ग्रासलेल्या भारतीय शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे चार हजार अंकाने कोसळला. दिवसभरात गुंतवणूकदारांचे १३.८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून कित्येक बड्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात जबरदस्त घसरण झाली आहे. गेल्या महिनाभरात शेअर बाजारातील पडझडीमुळे ५६.२२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा जबरदस्त घसरणीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची वेळ मुंबई शेअर बाजारात आली. १३ मार्च रोजी मुंबई निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी मध्ये जबरदस्त घसरण झाली होती. मुंबई निर्देशांक सुमारे तीन हजार अंकाने कोसळला होता. २००९ सालानंतर पहिल्यांदाच निफ्टी निर्देशांकानेही दिवसभरातील घसरणीची नीचांक पातळी गाठली होती व त्यामुळे व्यवहार थांबवण्याची वेळ आली होती.

सोमवारी पुन्हा तशीच वेळ मुंबई व निफ्टी निर्देशांकात आली. मुंबई निर्देशांक ३,९३५ अंकाने कोसळला. त्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी रक्तरंजित ठरल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. एका दिवसात इतकी मोठी घसरण शेअर बाजाराने कधीही झाली नव्हती. मुंबई शेअर निर्देशांक सुमारे १३ टक्क्यांनी घसरून २५ हजार ९८१ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ७ हजार ६१० वर बंद झाला. सर्व प्रमुख कंपन्यांचे शेअर कोसळले असून ऍक्सिस बँकेचा शेअर मध्ये सर्वात जास्त २८ टक्के घसरण झाली.

कोरोनाव्हायरसमुळे शेअर बाजारात सतत घसरण होत आहे. दोनच दिवसांपुर्वी ‘सेबी’ने घसरण टाळण्यासाठी ‘शॉर्ट सेलिंग’ ला लगाम लावणारा निर्णय घेतला होता. तसेच आरबीआयने ३० हजार कोटींच्या सरकारी कर्जरोख्याच्या खरेदी करून बाजारात रोखता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे निर्णयही बाजारातील घसरण थांबवु शकलेले नाहीत. येत्या काही दिवसात ही घसरण राहील, अशी व्यक्त चिंता केली जात आहे.

leave a reply