सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोरांच्या हल्ल्यात तुर्कीची सुरक्षाचौकी उद्ध्वस्त

दमास्कस सिरियातील संघर्षात तुर्कीसंलग्न सिरियन बंडखोरांनी आता तुर्कीच्या विरोधातच दंड थोपाटले आहेत. या तुर्कीसंलग्न बंडखोरांनी इदलिबमधील तुर्कीच्या सुरक्षाचौकीवर हल्ले चढविल्याची घटना समोर येत आहे. गेल्या चार दिवसात सिरियातील तुर्कीच्या सैनिकांवर तुर्कीच्या बंडखोरांनी चढ्विलेला हा दुसरा हल्ला ठरतो.

सिरियाच्या उत्तरेकडील इदलिब प्रांतांत सुरू असलेला संघर्ष संपविण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी रशियाने तुर्कीसह संघर्षबंदी लागू केली होती. या संघर्षबंदीत रशियाचा विजय झाल्याचे बोलले जात होते. कारण या संघर्षबंदीच्या माध्यमातून रशियाने इदलिबमधील तुर्कीचे डाव हाणून पाडल्याचा दावा रशियन मध्यमानी केला होता. या संघर्षबंदीचे परिणाम येत्या काही दिवसात सिरियामध्ये दिसतील असेही रशियन विश्लेषक आणि माध्यमांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून इदलिबमध्ये तुर्कीच्या सैनिकांवर होणारे हल्ले, सदर संघर्षबंदीचे परिणाम असल्याचे दिसत आहे.

लेबेनीज वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इदलिबमधील तुर्कीच्या सुरक्षाचौकीवर काही तासांपूर्वी हल्ला झाला. इदलिबमार्गे अलेप्पोला लताकियाशी जोडणार्या ‘एम४’ महामार्गावरील तुर्कीच्या लष्करी चौकीवर सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोरांनी हल्ले चढविले. या हल्ल्यात ही सुरक्षाचौकी पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याबाबत तुर्कीच्या लष्कराने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण लेबेनीज वर्तमानपत्राने हल्ल्याच्या ठिकाणचा फोटो आणि वीडियो प्रसिद्ध केला आहे. गेल्या सात दिवसात इदलिबमध्ये तुर्कीच्या सैनिकांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

काही दिवसांपूर्वी तुर्कीसंलग्न बंडखोरांनी इदलिबमधील तुर्कीच्या लष्करी तळावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात तुर्कीचे दोन सैनिक ठार झाले. तर जवळच असणारी तुर्कीची दोन गस्तीवाहने देखील या बंडखोरानी नष्ट केली होती. सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोर या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचे उघड झाले होते. याबरोबर इदलिबमधील संघर्षात तुर्कीने किमान ६० सैनिक गमावल्याचे प्रसिद्ध झाले होते. एरवी सिरियन लष्कराच्या हल्ल्यात आपले सैनिक गमावल्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देणार्या तुर्कीने या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

काही दिवसांपूर्वी तुर्कीने सिरियाच्या इदलिबमधील हल्ले थांबवून रशियाबरोबर संघर्षबंदी लागू केली. पण सिरियातील अस्साद राजवटीच्या समर्थक रशियाबरोबर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केलेली संघर्षबंदी तुर्कीसंलग्न बंडखोरांना मान्य नाही. त्यामुळे आपला संताप व्यक्त करण्यासाठी तुर्कीसंलग्न बंडखोर तुर्कीच्या सैनिकांवर हल्ले चढवित असल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोरांमध्ये अलकायदा, आयएससंलग्न दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप सिरियाने केला होता.

दरम्यान, तुर्कीने इदलिबमध्ये हवाईसुरक्षा यंत्राणा तैनात करण्यासाठी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तुर्कीच्या या लष्करी हालचाली संघर्षबंदीचे उल्लंघन ठरू शकतात.

leave a reply