‘पूर्व भूमध्य’ युरोपसाठी ऊर्जेचा स्रोत ठरेल

- इस्रायल, ग्रीस व सायप्रसची घोषणा

निकोसिया – रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन आणि परस्परसंबंधांची अधिकाधिक आवश्यकता भासू लागली आहे. पूर्व भूमध्य समुद्रातून निघणारी इंधनवायूची पाईपलाईन लवकरच युरोपपर्यंत पोहोचणार आहे. पण त्याचबरोबर 2000 मेगावॅट क्षमतेचे विजेच्या केबल्सचे जाळेदेखील या सागरी क्षेत्रातून पसरविण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच पूर्व भूमध्य युरोपसाठी ऊर्जेचा स्रोत ठरतील, अशी घोषणा इस्रायल, ग्रीस व सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

‘पूर्व भूमध्य’ युरोपसाठी ऊर्जेचा स्रोत ठरेल - इस्रायल, ग्रीस व सायप्रसची घोषणाशुक्रवारी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन, ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकोस डेंडियास आणि सायप्रसचे परराष्ट्रमंत्री काँस्टँटिनोस कोंबोस यांच्या सायप्रसच्या राजधानीमध्ये बैठक पार पडली. भूमध्य समुद्रातील इस्रायलच्या इंधनवायूच्या निर्मितीकेंद्रातून बाहेर पडणारा इंधनवायूचा पुरवठा पाईपलाईनमार्गे सायप्रस व त्यानंतर ग्रीसपर्यंत नेण्याबाबत गेल्या वर्षी तीनही देशांमध्ये करार पार पडला होता. यामुळे ग्रीस व सायप्रसचे रशियाच्या इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, असा दावा केला जातो.

त्यामुळे सदर पाईपलाईनच्या पूर्ततेवर चर्चा करण्यासाठी इस्रायल, ग्रीस व सायप्रसचे परराष्ट्रमंत्री भेटले होते. यावेळी युरोपसाठी एनर्जी कॉरिडोर उभारण्यावरही तीनही परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. ‘पूर्व भूमध्य’ युरोपसाठी ऊर्जेचा स्रोत ठरेल - इस्रायल, ग्रीस व सायप्रसची घोषणाइस्रायल, ग्रीस व सायप्रसमधील ‘ईस्ट मेड’ इंधन पाईपलाईनमुळे युरोपिय देशांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर किमान 2000 मेगावॅट इतक्या क्षमतेचे विजेच्या केबल्सचे जाळे सागराच्या तळाशी पसरल्यानंतर त्यातूनही युरोपला फायदाच होईल, असा दावा या तीनही परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

अक्षय ऊर्जेच्याबाबत इस्रायल अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारत असून त्याचा फायदा ग्रीस, सायप्रसबरोबर युरोपिय देशांनाही मिळू शकतो, असे परराष्ट्रमंत्री कोहेन म्हणाले. 1900 किलोमीटर पसरलेल्या ‘ईस्ट मेड’ इंधन पाईपलाईनसाठी सहा अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. यासाठी युरोपिय महासंघाच्या ‘कनेक्टिंग युरोप फॅसिलिटी’ अंतर्गत 1.74 अब्ज डॉलर्सचा निधी मिळविणार असल्याची माहितीही कोहेन यांनी दिली. त्याचबरोबर तुर्कीने देखील या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले.

leave a reply