ब्रिक्स गटाकडून नवे चलन विकसित करण्यात येत आहे

- रशियन संसदेच्या उपाध्यक्षांचा दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियासह भारत,चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका या देशांचे संघटन असलेल्या ‘ब्रिक्स’कडून विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. याचाच भाग म्हणून ब्रिक्स गटातील देश नवे चलन विकसित करीत आहेत, असे वक्तव्य रशियन संसदेचे उपाध्यक्ष अलेक्झांडर बाबाकोव्ह यांनी केले. नजिकच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील दरबानमध्ये ‘ब्रिक्स’ची बैठक होणार असून यात नवे चलन सादर केले जाईल, असे रशियन संसदेच्या उपाध्यक्षांनी स्पष्ट केले. दरम्यान, ब्रिक्स गटाने अमेरिकी डॉलरच्या प्रभावाला आव्हान द्यावे, असा सल्ला गोल्डमॅन सॅक्स या वित्तसंस्थेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ जिम ओनिल यांनी दिला आहे.

ब्रिक्स गटाकडून नवे चलन विकसित करण्यात येत आहे - रशियन संसदेच्या उपाध्यक्षांचा दावारशिया, भारत व चीन यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’चे महत्त्व वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात समोर येत आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी स्थापन केलेल्या ‘जी7’सारख्या गटाला ‘ब्रिक्स’ आव्हान देत असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेकडून चीनविरोधात विविध स्तरांवर सुरू असलेली कारवाई या पार्श्वभूमीवर रशिया व चीन या दोन्ही देशांनी ब्रिक्सच्या विस्तारासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे वर्षभरात दिसून आले आहे.

गेल्या वर्षी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ब्रिक्सची बैठक झाली होती. या बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय राखीव चलन व पर्यायी पेमेंट सिस्टिमवर काम करीत असल्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकी डॉलरला पर्याय म्हणून ब्रिक्सच्या राखीव चलनाचा वापर होऊ शकतो, असेही पुतिन यांनी सांगितले होते. त्यानंतर रशिया तसेच चीनकडून जगातील आघाडीच्या देशांबरोबर ब्रिक्सच्या मुद्यावरून सातत्याने चर्चा होत आहे. ब्रिक्स गटाकडून नवे चलन विकसित करण्यात येत आहे - रशियन संसदेच्या उपाध्यक्षांचा दावानोव्हेंबर महिन्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, ‘ब्रिक्स’मध्ये जवळपास 12 हून अधिक नवे देश सामील होण्याची शक्यता वर्तविली होती. या देशांमध्ये आखात, लॅटिन अमेरिका व आफ्रिका खंडातील आघाडीच्या देशांचा समावेश असेल, असे संकेतही देण्यात आले होते.

या घडामोडी सुरू असतानाच रशियन संसदेच्या उपाध्यक्षांनी दरबान बैठकीत नवे चलन सादर करण्याचे संकेत देऊन खळबळ उडविली आहे. ही बैठक ऑगस्ट महिन्यात होणार आहे. ‘राष्ट्रीय चलनांमध्ये व्यवहार सुरू करणे हा पहिला टप्पा होता. नजिकच्या काळात डिजिटल अथवा इतर स्वरुपातील नव्या चलनाचा वापर सुरू करणे हा पुढचा टप्पा असेल. ब्रिक्स गटाच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत या योजनेसंदर्भात घोषणा होईल’, असे रशियन संसदेचे उपाध्यक्ष अलेक्झांडर बाबाकोव्ह यांनी सांगितले. ब्रिक्स गट एक स्वतंत्र चलन सादर करण्यात यशस्वी होईल व हे चलन सोने तसेच रेअर अर्थ मिनरल्ससारख्या घटकांशी जोडलेले असू शकते, असा दावाही त्यांनी केला.

ब्रिक्स गटाकडून नवे चलन विकसित करण्यात येत आहे - रशियन संसदेच्या उपाध्यक्षांचा दावादरम्यान, जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांपैकी एक ‘गोल्डमन सॅक्स’च्या माजी प्रमुख अर्थतज्ज्ञांनीही ब्रिक्सला नव्या चलनाबाबत सल्ला दिल्याचे समोर आले आहे. ‘आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत अमेरिकी डॉलरचे वर्चस्व आहे. जेव्हा अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह बोर्ड पतधोरणात बदल करतात तेव्हा त्याचे गंभीर परिणाम इतरांवर दिसून येतात. डॉलरमध्ये कर्ज असणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसतो. त्यामुळे आता ब्रिक्स देशांनी त्याला आव्हान देऊन गटाच्या विस्तारासाठी तसेच नव्या चलनासाठी प्रयत्न करायला हवेत’, असे आवाहन ओनिल यांनी केले.

सध्या ब्रिक्समध्ये रशिया, भारत, चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिकेचा समावेश असून हे देश जगातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्त्व करतात. जागतिक अर्थव्यवस्थेतील जवळपास 25 टक्के हिस्सा या अर्थव्यवस्थांकडे आहे.

leave a reply