भारत-अमेरिकेच्या वैज्ञानिकांचे कोरोनावर संयुक्त संशोधन

नवी दिल्ली – कोरोनाची साथ रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर संशोधन सुरु आहे. भारत आणि अमेरिकेचे संशोधकही प्राथमिक निदान चाचण्या, अँटीव्हायरल थेरपी, ड्रग रिपर्पोझिंग, व्हेंटिलेटर रिसर्च, कोरोनाची लक्षणे ओळखणारे सेन्सर अशा कोरोनाशी संबंधित तंत्रज्ञानावर संशोधन हाती घेणार आहेत. यासाठी दोन्ही देशांच्या संशोधकांचे ११ गट तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे.

संशोधन

‘यूएस-इंडिया सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी एडोवमेंट फंड’च्या (यूएसआयएसटीईएफ) माध्यमातून या संशोधनाला सहाय्य करण्यात येत आहे. भारताच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय’ आणि अमेरिकेमध्ये झालेल्या करारांतर्गत ‘यूएसआयएसटीईएफ’ची एप्रिल महिन्यात स्थापना करण्यात आली होती. यानुसार संशोधकांच्या ११ गट तयार करण्यात आले असून लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.

दोन्ही देशांचे संशोधक कोरोना व्हायरसची साथ व त्यावर दिल्या जाणाऱ्या उपचारांचे बारकाईने संशोधन करतील, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी दिली. भारत आणि अमेरिका कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्तपणे महत्वपूर्ण योगदान देतील,असा विश्वास यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या सायन्स, स्पेस ॲण्ड हेल्थ विभागाचे उपसचिव जोनाथन मारगोलिस यांनी व्यक्त केला आहे.

भारत आणि अमेरिकेला कोरोनासाथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिका आणि भारतात मोठ्या संख्येने या साथीचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देश हे संशोधन हाती घेत आहेत. भारताने याआधी इतर देशांबरोबरही यासंबंधी सहकार्य वाढविले आहे. इस्रायल, जपानबरोबर भारत कोरोनासंबंधित संशोधन हाती घेतले आहे. तसेच विविध कंपन्या व संशोधन संस्थांबरोबर भारतीय संस्था कोरोना लस विकसित करण्यासाठी काम करीत आहेत.

leave a reply