‘ॲक्ट ईस्ट’ व ‘नेबरहूड फर्स्ट’चे जबरदस्त परिणाम दिसत आहेत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

गुवाहाटी – ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या भारताने स्वीकारलेल्या धोरणांचा एकत्रित प्रभाव दिसू लागला आहे. आग्नेय आशियाई क्षेत्राच्याही पलिकडे जाणारे जबरदस्त परिणाम यामुळे समोर येतआहेत, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. ‘नॅचरल अलायज्‌‍ इन डेव्हलपमेंट अँड इंटरडिपेंडन्स-एनएडीआय-नदी’ या आसामच्या गुवाहटी येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत परराष्ट्रमंत्री बोलत होते. भारताने आपल्या ईशान्येकडील भागाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पांची माहिती देऊन, यामुळे भारत भौगोलिक स्थितीवर मात करून नवा इतिहास घडविल, असा विश्वास परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

‘ॲक्ट ईस्ट' व ‘नेबरहूड फर्स्ट'चे जबरदस्त परिणाम दिसत आहेत - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरम्यानमार व बांगलादेश या शेजारी देशांमध्ये भारताने पायाभूत सुविधांचे जोडणी प्रकल्प सुरू केले आहेत. याचा दाखला देऊन जयशंकर यांनी याचे जबरदस्त लाभ पुढच्या काळात मिळतील असे म्हटले आहे. भारताच्या ईशान्येकडील भागाची म्यानमारद्वारे जमिनी मार्गाने तर बांगलादेशद्वारे सागरी मार्गाने कनेक्टिव्हिटी वाढविणाऱ्या प्रकल्पांमुळे भारत व्हिएतनाम व फिलिपाईन्सपर्यंत पोहोचेल. यामुळे पूर्व-पश्चिमेच्या व्यापारात येणारे भौगोलिक अडथळे दूर करून नवा इतिहास लिहिण्याची संधी आपल्याला मिळेल. याने सारे चित्रच पाटलून जाईल, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले.

असियानचे सदस्यदेश व जपान देखील यामुळे भारताशी व्यापारीदृष्ट्या अधिक घट्टपणे जोडला जाईल. याचा सकारात्मक प्रभाव ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’वर पडेल. आपल्याला राजकीय व आर्थिक आघाडीवर नेमकी पावले टाकता आली, तर हे यश मिळाल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या दाव्याची पुष्टी करणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची जंत्रीच यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सादर केली.

भारत आणि बांगलादेशमध्ये सहा रेल्वेमार्ग सुरू करण्यात येत आहेत. नेपाळ, भूतान आणि म्यानमार या देशांशी भारत वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्य करीत आहे. म्यानमारच्या कलादान येथे पायाभूत सुविधांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांना इथल्या भौगोलिक स्थिती आणि अतिरेक्यांच्या कारवायांचे आव्हान मिळत आहे. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्याखेरीज भारत स्वस्थ बसणार नाही, असे जयशंकर म्हणाले. कोलकता आणि म्यानमारचे सित्वे बंदर जोडणारा प्रकल्प 2023 सालच्या मर्च महिन्यात कार्यान्वित होईल. याबरोबरच आसाममधून जाणारी रेल्वेलाईन भूतानपर्यंत पोहोचविण्याच्या योजनेच्या व्यवहार्यतेवर भारत काम करीत आहे, अशी माहिती जयशंकर यांनी दिली. नेपाळ, भूतान या देशांमधील बौद्धधर्मियांची तीर्थक्षेत्रे जोडण्याची योजना यामुळे साकार होऊ शकते, असा दावा जयशंकर यांनी केला.

हे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाले तर भारत आपल्या ईशान्येकडील राज्यांशी व त्यापलिकडे असलेल्या शेजारी देशांशी अधिक घट्टपणे जोडला जाईल. याने क्षेत्रिय अर्थकारणाची स्थितीगती पूर्णपणे पालटेल. भारताचा ईशान्येकडील भाग अर्थकारणाचे नवे केंद्र बनेल. नव्या सप्लाय लाईन्स खुल्या झाल्याने इथे स्त्रोत आणि कौशल्य यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा आत्मविश्वास परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply