युक्रेनचा भूभाग रशियात विलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत

-अमेरिकेचा आरोप

John-Kirbवॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – क्रिमिआमध्ये 2014 साली राबविलेल्या योजनेची पुनरावृत्ती घडवून रशिया युक्रेनचा अतिरिक्त भूभाग आपल्यात विलिन करून घेण्याचे प्रयत्न करीत आहे, असा आरोप अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी केला. अमेरिकेकडे यासंदर्भातील पुरावे असून रशियाच्या कारवाया युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याचा दावाही अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केला. अमेरिकेतील रशियन दूतावासाने हे आरोप फेटाळले आहेत.

युक्रेनकडून नाटोच्या सदस्यत्वासाठी चाललेले प्रयत्न व नवनाझी गटांचा वाढता प्रभाव रोखणे हे मुद्दे पुढे करून रशियाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनवर हल्ला चढविला. त्यानंतर गेल्या साडेचार महिन्यात रशियाने युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविला असून डोनेत्स्क, झॅपोरिझिआ तसेच खेर्सनमधील मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. लुहान्स्क तसेच डोनेत्स्क प्रांताला रशियाने स्वतंत्र ‘रिपब्लिक’ म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर आता झॅपोरिझिआ व खेर्सनमध्येही सार्वमत घेण्यासह इतर यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ukraine-territoryरशियाचे हे प्रयत्न 2014 साली युक्रेनचा क्रिमिआ प्रांत ताब्यात घेण्यासाठी राबविलेल्या डावपेचांची पुनरावृत्ती असल्याचा आरोप अमेरिकेने केला. ‘रशियन राजवट लुहान्स्क व डोनेत्स्कसह झॅपोरिझिआ व खेर्सन प्रांत रशियात विलिन करून घेण्याची विस्तृत योजना तयार करीत आहे. त्यासाठी या प्रांतांमध्ये रशियन अधिकाऱ्यांची नियुक्ती, रशियन बँकांची उभारणी, रशियन चलनाचा वापर अशा विविध माध्यमांमधून पायाभरणी सुरू आहे. त्यानंतर सार्वमताचा वापर करून युक्रेनचा भाग विलिन करून घेण्यात येईल’, असा दावा ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केला.

अमेरिकेकडे यासंदर्भातील माहिती पुराव्यांसह उपलब्ध असल्याचेही किरबाय यांनी सांगितले. वर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर आक्रमणाची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. आता ते युक्रेनचा भूभाग विलिन करण्याची योजना नसल्याचे सांगतील व त्यावर इतरांनी विश्वास ठेवावा, अशी रशियाची अपेक्षा असेल, असा टोलाही अमेरिकी प्रवक्त्यांनी लगावला. बळाच्या जोरावर एखादा भाग विलिन करून घेणे हे ‘युएन चार्टर’च्या विरोधात असून अमेरिका ही बाब खपवून घेणार नाही, असा इशाराही किरबाय यांनी दिला.

अमेरिकी प्रवक्त्यांच्या आरोपांवर रशियाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘रशियाच्या मोहिमेबाबत अमेरिकेने केलेले दावे चुकीचे आहेत. युक्रेनमधील मुक्त केलेल्या क्षेत्रात शांतता निर्माण होऊन जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या भागातील जनता त्यांचे भवितव्य स्वतःच निश्चित करील, असे रशिया सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे’, अशा शब्दात अमेरिकेतील रशियन दूतावासाने किरबाय यांचे दावे फेटाळले.

leave a reply