युक्रेनच्या मुद्यावर रशियाला इराणचे जोरदार समर्थन

Iran Russia Turkeyतेहरान – ‘रशियावर हल्ला चढविण्याचा मार्ग खुला असता तर नाटोने कुठल्याही मर्यादा आणि सीमेचे बंधन पाळले नसते. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला नसता, तर पाश्चिमात्य देशांच्या आघाडीने रशियाच्या विरोधात युद्धाची घोषणा केली असती’, असा दावा करून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी रशियाच्या युक्रेनवरील लष्करी कारवाईचे समर्थन केले. तसेच युक्रेनच्या जनतेला भोगाव्या लागणाऱ्या यातनांसाठी पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचा ठपका खामेनी यांनी ठेवला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सिरिया तसेच क्षेत्रीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी इराणच्या दौऱ्यावर आले होते. सिरियाबाबत सहकार्य वाढविण्यावर रशिया तसेच इराण व तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये एकमत झाले. त्याचबरोबर गेल्या साडेचार महिन्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी रशियन राष्ट्राध्यक्षांना इराणमधून जोरदार समर्थन मिळाले. स्वतंत्र आणि मजबूत रशिया नको, म्हणून पाश्चिमात्य देश युक्रेनमधील संघर्षाच्या निमित्ताने रशियाला लक्ष्य करीत असल्याचा ठपका इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी ठेवला.

Iran Russiaरशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन, इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्यातील या बैठकीच्या निमित्ताने युक्रेनमधील अन्नधान्याच्या निर्यातीच्या मुद्यावरही चर्चा झाली. रशियाच्या ताब्यात असलेली युक्रेनमधील अन्नधान्यांनी भरलेली जहाजे जागतिक बाजारपेठेत रवाना करण्यास रशिया तयार आहे. पण त्याआधी पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या अन्नधान्याच्या निर्यातीवर टाकलेले निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली. तसेच रशिया व युक्रेनमध्ये वाटाघाटींसाठी तुर्कीने केलेल्या मध्यस्थीचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वागत केले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आखाती देशांच्या दौऱ्यावरआले होते. रशिया व इंधनटंचाईबाबत सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांचे समर्थन मिळविण्यात बायडेन अपयशी ठरल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पुढच्या दोन दिवसात इराणला भेट देणारे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनच्या मुद्यावर आपल्या मित्रदेशांचे समर्थन मिळविण्यात यशस्वी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply