विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदावर निवड

कोलंबो – हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या रानिल विक्रमसिंघे यांचीच श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. बुधवारी श्रीलंकेच्या संसदेत पार पडलेल्या मतदानात विक्रमसिंघे यांना 134 मते मिळाली. ‘आपला देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, आपल्यासमोर खडतर आव्हाने खडी ठाकली आहेत. त्यांना तोंड देणे याला मी सर्वाधिक प्राधान्य देईन’, अशा शब्दात राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी आपली भूमिका मांडली.

Sri-Lankan-Presidentश्रीलंकेतील परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. परकीय चलनाची टंचाई व कर्जाचे प्रचंड ओझे, यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात राजपक्षे सरकारला अपयश आल्याने जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला. त्याचे रुपांतर देशव्यापी निदर्शनांमध्ये होऊन प्रचंड हिंसाचार उसळला. श्रीलंकेतील ही अराजकसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न फसले. त्यामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे तसेच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना राजीनामा देणे भाग पडले होते.

राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर विक्रमसिंघे यांनी प्रथम पंतप्रधान व नंतर हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. आता श्रीलंकेच्या राजकारणात काही दशके घालविले अनुभवी नेते म्हणून रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची सूत्रे सोपविण्यात आलेलीआहेत. श्रीलंकेतील काहीजणांनी त्यांच्या नियुक्तीवर समाधान व्यक्त केले. मात्र विक्रमसिंघे यांना राजपक्षे यांच्या गटाचे समर्थन मिळाले असून ही बाब निदर्शकांना खटकल्याचे दिसत आहे. म्हणूनच निदर्शकांच्या काही यापुढेही आपली निदर्शने कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, रानिल विक्रमसिंघे यांच्या राष्ट्रपतीपदावरील निवडीमागे भारताचा हात असल्याचे दावे करण्यात येत होते. पण श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने हे दावे फेटाळले आहेत. भारत दुसऱ्या देशातील कारभार व लोकशाहीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करीत नाही, असा खुलासा भारताच्या उच्चायुक्तालयाने दिला. त्याचवेळी श्रीलंकेचे स्थैर्य व हा देश पूर्वपदावर येण्यासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य करील, असे आश्वास भारताच्या उच्चायुक्तालयाने दिले आहे.

leave a reply