‘रेड सी’ क्षेत्रातील तुर्कीच्या प्रभावाला शह देण्यासाठी इजिप्तकडून इस्रायल व सुदानबरोबर आघाडीचे संकेत

कैरो/जेरुसलेम/अंकारा – तुर्कीकडून गेली काही वर्षे सोमालियातील प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ‘रेड सी’वर नियंत्रण मिळविण्याची तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र इजिप्तने या प्रयत्नांना विरोध सुरू केला असून तुर्कीचे इरादे उधळण्यासाठी इस्रायल व सुदान या देशांबरोबर आघाडी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. इजिप्तच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संकेत दिल्याची माहिती तुर्कीसह आखातातील काही माध्यमांनी दिली. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल व सुदानमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याबाबत करार झाला होता.

गेल्या काही वर्षात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी तुर्की जनतेला ऐतिहासिक ‘ऑटोमन साम्राज्याची’ स्वप्ने दाखविण्यास सुरुवात केली. त्यानुसार एर्दोगन यांनी तुर्कीचा प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामागे एर्दोगन यांची इस्लामी जगताचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचेही सांगण्यात येते. आफ्रिकी देशांपासून ते आग्नेय आशियाई देशांपर्यंत तुर्की संस्कृती आणि आर्थिक व लष्करी सामर्थ्य यांच्या जोरावर हस्तक्षेप सुरू आहे. गेल्या दशकापासून सोमालियातही हळुहळू शिरकाव सुरू झाला आहे. सध्या तुर्की हा सोमालियाचा प्रमुख भागीदार व मित्रदेश म्हणून उदयाला येत असल्याचे उघड होत आहे.

तुर्कीने आतापर्यंत सोमालियात जवळपास एक अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. यात ‘तुर्कसोम’ या लष्करी तळासह देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल, राजधानी मोगादिशुमधील विमानतळ, दूतावास, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य यांचा समावेश आहे. ‘तुर्कसोम’ हा तुर्कीचा परदेशातील सर्वात मोठा लष्करी तळ म्हणून ओळखण्यात येतो. तुर्कीचे 200हून अधिक जवान या तळावर तैनात असून तुर्की बोलणाऱ्या 10 हजार सोमालियन सैनिकांचे पथक तयार करण्याची योजना आहे. सोमालियाच्या सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन करण्यासाठी तुर्कीला आमंत्रण देण्यात आल्याचे वृत्तही या वर्षाच्या सुरुवातील प्रसिद्ध झाले होते.

सोमालियातील तुर्कीच्या या वाढत्या हालचाली इजिप्तला चांगल्याच खटकल्या आहेत. सोमालियाच्या माध्यमातून तुर्की ‘रेड सी’ क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्याची भीती असल्याने इजिप्तला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इजिप्तने इस्रायल व सुदान यांच्या सहाय्याने आघाडी उघडून तुर्कीच्या महत्त्वाकांक्षा उधळण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्यात या आघाडीमध्ये सौदी अरेबियाच्या समावेशाची दाट शक्यता असल्याचे संकेत सुदानी विश्‍लेषक व पत्रकारांनी दिले आहेत. तर येत्या काही दिवसात इजिप्त, इस्रायल व सुदानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचा दावाही तुर्कीच्या माध्यमांनी केला आहे.

leave a reply