चीनचा ‘धोका’ म्हणून उल्लेख थांबविला नाही तर संवाद बंद करू

- चीनने ऑस्ट्रेलियाला धमकावले

बीजिंग/कॅनबेरा – चीन हा ऑस्ट्रेलियासाठी सामरिक धोका आहे असे मानून यापुढेही ऑस्ट्रेलिया सरकारने चीनविरोधी निर्णय घेणे सुरूच ठेवले, तर चीनचे मंत्री व नेते ऑस्ट्रेलियन नेत्यांच्या फोनलाही उत्तर देणार नाहीत, अशी धमकी चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ऑस्ट्रेलियातील चिनी दूतावासाच्या अधिकाऱ्याने ही धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील एका दैनिकाशी बोलताना चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांनी, दोन देशांमधील संबंध बिघडण्यामागे ऑस्ट्रेलियाच असल्याचा आरोप केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया शीतयुद्धकालिन मानसिकतेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचा ठपकाही ठेवला.

चीन व ऑस्ट्रेलिया या प्रमुख व्यापारी भागीदार देशांमधील तणाव गेल्या काही वर्षांपासून हळूहळू समोर येत होता. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत राजकारणातील हस्तक्षेप व सायबरहल्ले यासारख्या मुद्द्यांमुळे वाढत गेलेल्या तणावात यावर्षी कोरोना साथीची भर पडली आहे. त्याचवेळी हाँगकाँग, तैवान तसेच साऊथ चायना सीच्या मुद्द्यावरही ऑस्ट्रेलियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाने चीनच्या कारवाया रोखण्यासाठी तीन कायदे संमत केले असून नव्या विधेयकांचे संकेतही दिले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिळणाऱ्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीन चांगलाच बिथरला असून आता थेट धमकावण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात चिनी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी कोरोना साथीवरून इशारा देताना, ऑस्ट्रेलियाने विश्‍वासघात केल्याचा आरोप केला होता. आता त्यापुढे जात ऑस्ट्रेलियन नेत्यांबरोबर संवाद बंद करण्याची धमकी चिनी दूतावासाकडून देण्यात आली आहे. ही धमकी देतानाच दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे संपूर्ण खापर ऑस्ट्रेलियावरच फोडण्याचा बेजबाबदारपणाही चीनने दाखविला आहे. ‘चीन व ऑस्ट्रेलियामधील ढासळते संबंध सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आत्मपरिक्षण करून पावले उचलायला हवीत. टाळी दोन हातांनी वाजते, असे आपण म्हणतो. पण इथे सर्व समस्या ऑस्ट्रेलियामुळेच निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया शीतयुद्धकालिन मानसिकतेतून चीनचे संबंध हाताळताना दिसत आहे. ही मानसिकता सोडून चीन हा धोका नाही तर संधी आहे, अशी भूमिका ऑस्ट्रेलियाने घ्यायला हवी. तसे केले नाही तर दोन देशांमधील सहकार्याचा पायाच उद्ध्वस्त होईल’, असा इशारा चिनी दूतावासाच्या अधिकाऱ्याने दिला.

चीनकडून येणाऱ्या धमक्या व इशाऱ्यानंतरही ऑस्ट्रेलियाने आपली भूमिका कायम ठेवली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या धमकीवर ऑस्ट्रेलियाने अद्याप प्रतिक्रिया नोंदविली नसली तरी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनला स्पष्ट शब्दात बजावले होते. ‘चीनच्या दबावासमोर नमते घेऊन ऑस्ट्रेलिया अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि सुरक्षेशी अजिबात तडजोड करणार नाही. ऑस्ट्रेलिया कायम ऑस्ट्रेलियाच राहिल’, असे पंतप्रधान मॉरिसन यांनी ठणकावले होते. आपल्या सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेत कुठलाही बदल होणार नसल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी स्पष्ट केले होते.

leave a reply