परदेशात प्रवासाची नोंद नसलेले ‘ओमिक्रॉन’चे आठ नवे रुग्ण महाराष्ट्रात आढळले

- सरकारी यंत्रणांसमोरील चिंता वाढल्या

मुंबई – मंगळवारी महाराष्ट्रात आठ रुग्णांना ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या आठही रुग्णांची परदेश प्रवासाची कोणतीही हिस्ट्री नाही. त्यामुळे आरोग्य व अंमलबजावणी यंत्रणासमोरील चिंता वाढल्या आहेत. यातील सात रुग्ण हे मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण मुंबई शेजारील विरार-वसईतील आहे. यामुळे देशातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या ५७ वर पोहोचली आहे.

परदेशात प्रवासाची नोंद नसलेले ‘ओमिक्रॉन’चे आठ नवे रुग्ण महाराष्ट्रात आढळले - सरकारी यंत्रणांसमोरील चिंता वाढल्यादेशात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही संख्या ६ हजाराच्या खाली आली आहे. मात्र दुसर्‍या बाजूला ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढविल्या आहेत. देशात ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मंगळवारी दिल्ली आणि राजस्थानमध्ये चार चार नवे रुग्ण आढळले, तर गुजरातमध्येही ‘ओमिक्रॉन’च्या दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सायंकाळी महाराष्ट्रातीलही काही कोरोनाच्या रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल आले. यामध्ये आठ जणांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यातील सात रुग्ण मुंबईतील असून एक रुग्ण वसई-विरार येथील आहे.

डब्ल्यूएचओसह जगभरातील शास्त्रज्ञांकडून ओमिक्रॉनबाबत सावधानतेचे इशारे देण्यात येत आहेत. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन आढळल्यानंतर काही आठवड्यात हा विषाणू ६० देशांमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून परदेशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी घेण्यासह त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

पण सोमवारी महाराष्ट्रात सापडलेल्या रुग्णांनी कोठेही प्रवास केलेला नसल्याने याकडे गांभीर्याने पाहण्यात येत आहे. यातील एक जण नुकताच बंगळुरूवरून आला होता, तर एकाने दिल्ली प्रवास केल्याची नोंद आहे. या नवीन रुग्णांसह आतापर्यंत महाराष्ट्रात सापडलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनचे आतापर्यंत मुंबई १२ रुग्ण सापडले आहेत. यासह पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा २ कल्याण डोंबिवली १, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. यातील ९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्यापासून गेल्या १० दिवसात देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ५०च्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारपासून पहिले ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण ओमिक्रॉनच्या नवीन रुग्णांमुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. ‘ओमिक्रॉन’ची रुग्ण संख्या वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्यासारख्या नियमांचे पालन करा, असे पुन्हा एकदा आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

leave a reply