इस्रायल, वेस्ट बँकमधील दंगलींमध्ये ११ जणांचा बळी

- दीडशेहून अधिक जखमी - ७५० हून अधिक जण अटकेत

जेरूसलेम/रामल्ला – सोमवारपासून इस्रायल आणि वेस्ट बँकमधील शहरांमध्ये इस्रायली पोलीस, ज्यूधर्मिय आणि पॅलेस्टिनींमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात ११ जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचारावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही, तर इस्रायलमध्ये गृहयुद्ध भडकेल, असा इशारा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. तर २००० सालच्या दुसर्‍या इंतिफादा अर्थात पॅलेस्टिनींच्या उठावानंतर इस्रायलमध्ये अशाप्रकारची तीव्र निदर्शने पहिल्यांदाच पहायला मिळाल्याचा दावा पॅलेस्टिनी यंत्रणा करीत आहेत.

जेरूसलेममधील तणाव आणि त्यानंतर इस्रायली लष्कर व हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष याचे पडसाद इस्रायल तसेच वेस्ट बँकमधील शहरांमध्ये उमटू लागले आहेत. ज्यूधर्मिय आणि पॅलेस्टिनींची संमिश्र वस्ती असलेल्या इस्रायलच्या तेल अविव, लॉड तर वेस्ट बँकमधील रामल्ला, नाब्लस या शहरांमध्ये दंगली पेटल्या आहेत. याशिवाय इतरही शहरांमध्ये तुरळक प्रमाणात हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सोमवारपासून पेटलेल्या या दंगली काहीशा नियंत्रित होत्या. पण शुक्रवारी संध्याकाळी तेल अविव व नाब्लस शहरांमध्ये पॅलेस्टिनी दंगलखोरांनी इस्रायली पोलिसांवर जोरदार हल्ले केले. या दंगली भडकविणार्‍या व चिथावणी देणार्‍या नेत्यांना अटक करण्यासाठी इस्रायली पोलीस दाखल झाल्यानंतर दंगलखोरांनी जोरदार दगडफेक केल्याची तसेच पेट्रोल बॉम्बचे हल्ले चढविल्याची माहिती इस्रायली पोलिसांनी दिली. इस्रायली पोलिसांनी देखील दंगलखोरांच्या विरोधात रबर बुलेट्स, अश्रुधूर तर काही ठिकाणी लाईव्ह फायरचा वापर केला.

इस्रायली पोलिसांनी एका रात्रीत या दंगलखोरांवर केलेल्या कारवाईत शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. तर गेल्या पाच दिवसात ७५० हून अधिक जणांना अटक झाली आहे. आत्तापर्यंतच्या दंगलींमध्ये दीडशेहून अधिक जण जखमी झाल्याचा दावा केला जातो. गेल्या पाच दिवसांच्या पॅलेस्टिनी दंगलखोरांनी प्रार्थनास्थळाला आग लावल्याची घटना घडली आहे. तसेच येथील बस स्टँडची जाळपोळ केल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत.

leave a reply