राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर हैतीमध्ये इमर्जन्सीची घोषणा – हल्लेखोरांपैकी चार ठार तर दोघांना अटक

हैतीपोर्ट ओ प्रिन्स/वॉशिंग्टन – अमेरिकेनजिकच्या ‘कॅरिबिअन आयलंड’ क्षेत्रातील तिसर्‍या क्रमाकांचा मोठा देश म्हणून ओळख असणार्‍या हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनल मॉईस यांची हत्या झाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मॉईस यांच्या खाजगी निवासस्थानावर हल्ला चढविल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मॉईस यांच्या पत्नी मार्टिन गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी अमेरिकेत हलविण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्षांची हत्या घडविणारे प्रशिक्षित भाडोत्री मारेकरी असल्याचे समोर येत असून सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत चार हल्लेखोर ठार झाल्याचे सांगण्यात येते.

हैतीची राजधानी पोर्ट ओ प्रिन्समध्ये ‘पेलेरिन 5’ भागात राष्ट्राध्यक्ष मॉईस यांचे खाजगी निवासस्थान आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला चढविला. हल्ला करण्यापूर्वी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी मेगाफोनवरून अमेरिकेची ‘ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी’ कारवाई करीत असल्याची घोषणा केली. निवासस्थानी घुसल्यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना व सुरक्षारक्षकांना बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मॉईस व त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. राष्ट्राध्यक्ष मॉईस यांच्यावर तब्बल 12 गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले आहे.

हैतीहल्ल्यानंतर मारेकर्‍यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हैतीच्या सुरक्षायंत्रणांनी राजधानी पोर्ट ओ प्रिन्समध्ये संचारबंदी लागू करीत आक्रमक शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान उडालेल्या एका चकमकीत चार हल्लेखोर ठार झाले असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठार झालेले हल्लेखोर तसेच संशयित प्रशिक्षित भाडोत्री मारेकरी असल्याचे समोर येत आहे. यात व्हेनेझुएला व कोलंबियन नागरिकांसह हैतीच्या नागरिकांचाही समावेश असल्याचा दावा सुरक्षायंत्रणांनी केला. हल्लेखोरांकडे परदेशी शस्त्रे सापडली असून ते इंग्रजी तसेच स्पॅनिश भाषेत संभाषण करीत असल्याची माहिती उघड झाली आहे.

हैतीहैतीचे पंतप्रधान क्लॉडी जोसेफ यांनी राष्ट्राध्यक्ष मॉईस यांच्या हत्येची पुष्टी केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर सर्व सूत्रे पंतप्रधान जोसेफ यांनी हाती घेतली असून देशात ‘स्टेट ऑफ सीज’ची घोषणा करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मॉईस यांनी आपल्या हत्येचा कट आखण्यात येत असल्याचे सांगून खळबळ उडवली होती. त्यानंतर पोलिसांनी हैतील काही वरिष्ठ अधिकार्‍यांसह अनेकांना ताब्यातही घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर झालेली हत्या लक्ष वेधून घेणारी ठरते. हत्या झाल्यानंतर सुरुवातीला अमेरिकी यंत्रणांकडून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र हैतीतील अमेरिकी राजदूतांनी ही शक्यता फेटाळून लावली असून तपासात सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मॉईस यांच्या हत्येवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेने गुरुवारी विशेष बैठकीचेही आयोजन केले आहे. जोवेनल मॉईस 2017 सालापासून हैतीचे राष्ट्राध्यक्ष होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हैतीत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू असून मॉईस यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत होती. 2010 साली हैतीत झालेला भीषण भूकंप व 2017 साली आलेली कॉलराची साथ यात हैतीतील तीन लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही नैसर्गिक आपत्ती, साथ व राजकीय अस्थैर्य यामुळे हैतीची दैना उडाली असून देशात अराजकसदृश स्थिती असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्ष मॉईस यांच्या हत्येमुळे या देशातील अस्थैर्य व अराजकात अधिकच भर पडली आहे.

leave a reply