राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – लॉकडाऊनमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्याची परवानगी राज्यसरकारने दिली आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीसंदर्भातील उपाययोजनांसाठी पार पडलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली.

राज्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसंदर्भात आज मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न-धान्य खरेदी करता यावी म्हणून दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवण्यासाठी परवानगी देतानाच संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्याऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही सूक्ष्म नियोजन सुरू आहे. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना स्टिकर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना पोलिसांकडून त्यांना अडविण्यात येणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना त्या-त्या विभागातील आरटीओकडून स्टिकर्सचा पुरवठा करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

leave a reply