अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचे दर कमी ठेवा – भारताचे चीनला आवाहन

नवी दिल्ली/बीजिंग – कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याचे दर स्थिर ठेवा, तसेच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्गो विमानांची सेवा पूर्ववत करा, असे आवाहन भारताने चीनला केले आहे. भारताच्या हॉंगकॉंगसाठीच्या कौन्सूल जनरल प्रियांका चौहान यांनी एका चिनी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे आवाहन केले.

वैद्यकीय, दर, प्रियांका चौहान, कौन्सूल जनरल, आवाहन, भारत, सिचुआन एअरलाईन्सभारतातील खाजगी वैद्यकीय कंपन्या चीनमधून अत्यावश्यक वैद्यकीय साधने व साहित्य मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र चीनने लादलेल्या नियमांमुळे त्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताने हे आवाहन केले आहे. ‘चीनमधून होणार्‍या वैद्यकीय घटकांच्या पुरवठ्याची साखळी खुली राहणे आवश्यक आहे. त्याचवेळी वैद्यकीय साधनांचे दरही स्थिर रहायला हवेत, अशी भारताची अपेक्षा आहे. सरकारी पातळीवरून यासाठी समर्थन तसेच प्रयत्न आवश्यक आहेत. चीनची राजवट या प्रकरणी नक्की कितपत प्रभाव टाकू शकते, याची कल्पना नाही. पण त्यांनी यासाठी पावले उचलली तर त्याचे स्वागत असेल’, असे हॉंगकॉंगसाठीच्या कौन्सूल जनरल प्रियांका चौहान म्हणाल्या.

चीनच्या ‘सिचुआन एअरलाईन्स’ या कंपनीने २६ एप्रिलपासून मालाची वाहतूक करणार्‍या ‘कार्गो फ्लाईट्स’च्या सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे चीनमधून भारतात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. भारतीय कंपन्यांनी हा मुद्दा सरकारकडे उपस्थित केला होता. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चर्चा केल्यावर त्यावर तोडगाही निघाला होता. मात्र पुन्हा नियम बदलल्याने भारतीय कंपन्या अडचणीत आल्याचे सांगण्यत येते.

एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या विरोधात आवश्यक ते सारे सहकार्य करण्यास आपण उत्सुक असल्याचे दावे करीत आहे. पण दुसर्‍या बाजूला चीन भारताच्या अडवणुकीची भूमिका घेत आहे. यामुळे आपण विश्‍वासार्ह नसल्याचे चीन दाखवून देत आहे. चीनच्या दुटप्पीपणे हे आणखी एक उदाहरण या निमित्ताने भारताच्या समोर येत आहे.

leave a reply