अमेरिकी संरक्षणदलांच्या माजी अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर तोफ डागली – १२४ अधिकार्‍यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रसिद्ध केले

वॉशिंग्टन – ज्यो बायडेन यांना २०२० सालच्या निवडणुकीत मिळालेला विजय, बायडेन यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य, चीनबाबतचे त्यांचे धोरण, यावर अमेरिकेच्या ऍडमिरल आणि जनरल पदावर कार्य केलेल्या माजी अधिकार्‍यांनी गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ‘फ्लॅग ऑफिसर्स फॉर अमेरिका’ या माजी अधिकार्‍यांच्या संघटनेने सध्या अमेरिकेच्या संवैधानिक अधिकारांवर हल्ले होत असल्याचा ठपका ठेवून हे सारे मुद्दे उपस्थित केले आहेत. सुमारे १२४ माजी अधिकार्‍यांची स्वाक्षरी असलेले पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून बायडेन प्रशासनाने स्वीकारलेल्या धोरणांवर या पत्रात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात अशारितीने इतक्या मोठ्या संख्येने संरक्षणदलांच्या माजी अधिकार्‍यांनी प्रशासनाच्या धोरणावर टीका केली नव्हती.

राष्ट्राध्यक्ष बायडेन, तोफ डागली, फ्लॅग ऑफिसर्स फॉर अमेरिका, संरक्षणदल, स्वाक्षरी, अमेरिका, बिग-टेकरोनाल्ड रिगन ते जॉर्ज बुश यांच्या काळात अत्यंत महत्त्वाची पदे भूषविणार्‍या माजी अधिकार्‍यांनी या पत्रावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. रोनाल्ड रिगन राष्ट्राध्यक्ष असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले रिअर ऍडमिरल जॉन पॉईंडेक्स्टर, जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असताना लष्करी गुप्तचर विभागाचे उपमंत्री लेफ्टनंट जनरल विल्यम बाव्किन, ब्रिगेडियर जनरल डोनाल्ड बोल्डक् यांचाही स्वाक्षर्‍या करणार्‍या माजी अधिकार्‍यांमध्ये समावेश आहे. अमेरिकन संरक्षणदलांचे माजी अधिकारी अशारितीने राजकारणात भाष्य करीत नाहीत. पण सध्या अमेरिकेसमोर भयंकर संकट खडे ठाकले असताना, शांत राहणे शक्य नाही, असे या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांपैकी एक असलेल्या मेजर जनरल ज्यो ऑर्बक्ले यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका देशबांधवांसमोर मांडणे हा या पत्राचा हेतू आहे, अशी माहिती ऑर्बक्ले यांनी एका नियतकालिकाशी बोलताना दिली. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची सध्याची मानसिक आणि शारिरीक अवस्था दुर्लक्षित करता येण्याजोगी नाही. ‘अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेले निर्णय कधीही घेण्याची क्षमता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असलीच पाहिजे’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहेत. पण तसे करण्याची क्षमता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे आहे का, अशी शंका या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते संरक्षणदलांकडे ‘न्यूक्लिअर कोड’ची विचारणा करीत आहेत. ही बाब अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अतिशय घातक ठरेल व याचा फायदा अमेरिकेचे शत्रू घेऊ शकतात, याकडे लक्ष वेधून याची जबाबदारी नक्की कुणाकडे सोपविण्यात आलेली आहे? असा सवाल या पत्रात माजी अधिकार्‍यांनी केला आहे. दिलेल्या आदेशाचे पालन करणारी संपूर्णपणे सुरक्षित अशी व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे, याचीही जाणीव या माजी अधिकार्‍यांनी करून दिली.

अमेरिकेत सुरू असलेल्या वैचारिक पातळीवरील युद्धाचा उल्लेख करून अमेरिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अशा द्वंद्वाचा सामना देशाला करावा लागला नव्हता. समावाद आणि मार्क्सवाद विरोधात संवैधानिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. अशा काळात अमेरिकेची संसद आणि उच्चपदस्थांचे आदेश धुडकावून अमेरिकेच्या सीमा खुल्या करण्याच्या धोरणांचा पुरस्कार केला जात आहे. त्याचवेळी ‘बिग-टेक’ कंपन्यांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे निर्णय घेतले जात आहेत, अशी टीका या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्याचवेळी बायडेन प्रशासनाच्या चीन व इराणविषयक धोरणावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाची साथ हा लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे का, असा थरकाप उडविणारा प्रश्‍नही या पत्रात विचारण्यात आला आहे.

या माजी लष्करी अधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरून बायडेन प्रशासनावर फार आधीपासूनच टीका सुरू झाली होती. अतिरेकी उदारमतवाद आणि ढोंगी डावी विचारसणी यांच्या प्रभावाखाली असलेले बायडेन प्रशासन अमेरिकेला धोक्यात टाकत आहेत, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार बजावले होते. आता संरक्षणदलांच्या माजी अधिकार्‍यांनी यासाठी बायडेन प्रशासनाला धारेवर धरून खुद्द बायडेन यांच्या शारिरीक व मानसिक स्थितीवरच उपस्थित केलेले प्रश्‍न अमेरिकेचे राजकारण ढवळून टाकणारे ठरतील. बायडेन प्रशासनाला याचा फार मोठा धक्का बसू शकतो.

leave a reply