तालिबानच्या राजवटीमुळे जागतिक दहशतवाद डोके वर काढण्याची शक्यता

- ऑस्ट्रेलियाचे संरक्षणदलप्रमुख

जागतिक दहशतवादकॅनबेरा – ‘अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर जागतिक दहशतवाद नव्याने डोके वर काढील. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही’, असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल अँगस कॅम्पबेल यांनी बजावले. त्याचबरोबर १७० ऑस्ट्रेलियन्स अजूनही अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती जनरल कॅम्पबेल यांनी दिली.

ऑस्ट्रेलियन सिनेटसमोरील सुनावणीत जनरल कॅम्पबेल यांनी अफगाणिस्तानातील ऑस्ट्रेलियाच्या सैन्यमाघारीचे समर्थन केले. पण तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यामुळे काही गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याचे जनरल कॅम्पबेल म्हणाले. दोहा करारातील अटींचे तालिबानने जबाबदारीने पालन करावे, अशी आंतरराष्ट्रीय समुदायाची मागणी असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणदलप्रमुखांनी सांगितले.

सर्वसमावेश सरकार आणि दहशतवादी संघटनांवरील कारवाई, या मागण्यांची तालिबानने पूर्तता करावी. अफगाणिस्तानातून जागतिक दहशतवाद उदयाला येताना पाहणे, आंतरराष्ट्रीय समुदायाला परवडणारे नसल्याचे जनरल कॅम्पबेल सिनेटसमोर म्हणाले. अल कायदा किंवा इतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना व त्यांच्या नेत्यांना तालिबानने अफगाणिस्तानात आश्रय देऊ नये, अशी मागणी कॅम्पबेल यांनी केली.

तालिबानच्या राजवटीत अल कायदा, आयएस व इतर दहशतवादी संघटना अधिक मजबूत होतील. तसेच अफगाणिस्तानातूनच अमेरिका, युरोपिय देशांवर नव्याने दहशतवादी हल्ले चढविले जातील, असा इशारा काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषकांनी दिला होता. जनरल कॅम्पबेल यांचा इशारा देखील त्याच धर्तीवर असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, तालिबानच्या दहशतवाद्यांनी रविवारी राजधानी काबुलमध्ये लष्करी संचलन केले. यावेळी अमेरिका मागे सोडून गेलेल्या रायफल्स व संरक्षणसाहित्यांसह तालिबानच्या दहशतवाद्यांनी ही परेड केली. तर रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टर्सचाही वापर तालिबानने या परेडमध्ये केला.

leave a reply