इथिओपियन लष्कराच्या हवाई हल्ल्यात 64 जणांचा बळी – 33 बेपत्ता तर 100 हून अधिक जखमी

आदिस अबाबा – इथिओपियन लष्कराने उत्तरेकडील तिगरे प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात 64 जणांचा बळी गेला. यामध्ये स्थानिकांचा समावेश असल्याचा आरोप केला जातो. तर जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत.

यामुळे इथिओपियन सरकार कोंडीत सापडले असून अमेरिकेने या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. तर तिगरेमधील बंडखोरांवरच कारवाई केल्याचा दावा इथिओपियन लष्कर करीत आहे.

इथिओपियन सरकार आणि तिगरे येथील बंडखोर यांच्यातील वाद गेल्या काही आठवड्यांपासून विकोपाला पोहोचला आहे. इथिओपियन पंतप्रधान अबि अहमद यांनी केलेले आवाहन धुडकावणार्‍या तिगरेमधील बंडखोरांवर लष्कराने हवाई हल्ले सुरू केले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे बंडखोर व त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे इथिओपियन लष्कराचे प्रवक्ते कर्नल गेटनेट अडाने यांनी म्हटले आहे. ही कारवाई तिगरेमधील जनतेविरोधात नव्हती, असे कर्नल अडाने सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पण इथिओपियन लष्कराने मंगळवारी चढविलेल्या हवाई हल्ल्यात येथील तोगोगा शहरातील रहिवाशी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे, हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनी सांगितले. इथिओपियन विमानांच्या या हल्ल्यात 64 जणांचा बळी गेला, 33 जण अद्याप बेपत्ता असून 100 जण जखमी असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमे देत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इथिओपियन लष्कराने तिगरेमध्ये चढविलेला सर्वात भीषण हल्ला ठरतो.

1988 साली इथिओपियातील कम्युनिस्ट राजवटीने तिगरे प्रांतातील एक हजाराहून अधिक स्थानिकांचे हत्याकांड घडविले होते. मंगळवारी 1988 सालच्या हत्याकांडाची आठवण म्हणून कार्यक्रम आयोजित केला असताना, इथिओपियन लष्कराने हवाई हल्ले चढविले. त्यामुळे इथिओपियन लष्कर तसेच पंतप्रधान अबि अहमद यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.

तीन दशकांपूर्वी इथिओपियातील कम्युनिस्ट राजवट उथलण्यात तिगरे प्रांतातील बंडखोरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 1991 ते 2018 या कालावधीत इथिओपिया सरकार व लष्करावर तिगरे प्रांताचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व होते. पण दोन वर्षांपूर्वी इथिओपियाच्या सत्तेवर अबि अहमद यांचे सरकार आल्यानंतर तिगरे प्रांतातील गटांबरोबरील तणाव वाढला. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान अहमद यांनी तिगरे प्रांतातील बंडखोरांना निर्णायक इशारा दिला होता. पण तिगरेतील बंडखोरांनी हा इशारा धुडकावल्यानंतर, इथिओपियन लष्कराने हल्ले सुरू केले.

दरम्यान, आफ्रिकेत दहशतवादाचा वणवा पेटल्याचा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. साहेल प्रांतापासून हॉर्न ऑफ आफ्रिकेतील देश दहशतवादाने होरपळत असल्याची चिंता अमेरिकेने व्यक्त केली होती. इथिओपियाचा देखील हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये समावेश केला जातो.

leave a reply