पाकिस्तानी लष्करातील उलथापालथींमुळे हफीज सईदच्या घराजवळील बॉम्बस्फोटाबाबतचा संशय वाढला

लाहोर – पाकिस्तानच्या लाहोरमधील हफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारत असल्याचा आरोप सुरू झाला आहे. काही पाकिस्तानी पत्रकार यासाठी भारतावर ठपका ठेवत असले, तरी यामागे वेगळ्याच गोष्टी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची हत्या घडविण्याचा कट पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांनीच आखल्याचे उघड झाले होते. या अधिकारी व कमांडोज्ना ताब्यात घेण्यात आले असून यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत हफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाकडे लक्ष वेधून यासाठी भारतावर आरोप करणे पाकिस्तानी लष्करासाठी आवश्यक बनल्याचे दिसत आहे.

बुधवारी लाहोरमधील हफीज सईदच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार व 21 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काही ठिकाणी छापे मारल्याच्या बातम्या येत आहेत. या घातपातमध्ये गुंतलेल्या एकाला अटक झाल्याची माहिती दिली जात आहे. त्याचवेळी पाकिस्तानची माध्यमे या घातपातामागे भारत असल्याचा आरोप करू लागली आहेत. मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला घडविणारा हफीज सईद भारताच्या निशाण्यावर होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून अल कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार केले होते. त्याच धर्तीवर भारताने हफीज सईद याला ठार करण्यासाठी हा घातपात घडविल्याचे दावे पाकिस्तानी पत्रकारांनी सुरू केले आहेत. याबाबतचा एकही पुरावा किंवा धागादोरा पाकिस्तानची माध्यमे व पत्रकार देऊ शकले नाहीत.

पाकिस्तानी लष्करातील उलथापालथींमुळे हफीज सईदच्या घराजवळील बॉम्बस्फोटाबाबतचा संशय वाढलाबुधवारच्या या स्फोटाआधी पाकिस्तानात फार मोठ्या उलथापालथी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा काटा काढण्याचा कट पाकिस्तानी लष्कराच्याच अधिकार्‍यांनी आखला होता. जनरल बाजवा 27 जून रोजी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील चकालच्या दौर्‍यावर जाणार होते. या प्रवासातच त्यांची हत्या घडविण्याचे कारस्थान उघड झाले आणि त्यानंतर मोठी कारवाई हाती घेण्यात आली. 19 जून रोजी रावळपिंडी येथे रात्री दहाच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या 66 जणांची धरपकड करण्यात आली. यात 14 अधिकारी, 22 कमांडोज् व 30 जवानांचा समावेश असल्याचे दावे केले जातात.

भारतीय माध्यमांमध्ये या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या माध्यमांनी स्वतःहून या बातम्या न देता, अशा अफवा उडविल्या जात असल्याचे वृत्त दिले. पाकिस्तानी लष्कराने याला दुजोरा दिलेला नाही. मात्र जनरल बाजवा फार आधीपासून असंतुष्ट लष्करी अधिकार्‍यांच्या निशाण्यावर होते, त्यामुळे पाकिस्तानी लष्करात दुफळी माजलेली आहे, हे पाकिस्तानी पत्रकारांनाही मान्य करावे लागत आहे. मात्र राष्ट्रीय माध्यमांवर याची चर्चा न करता, सोशल मीडियावर पाकिस्तानचे पत्रकार या बातमीबाबत आपले विचार मांडत आहेत. जनरल बाजवा यांनीच इम्रान?खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आणले. त्यांच्याकडून तीन वर्षाची मुदतवाढ घेऊन जनरल बाजवा यांनी आपले आसन स्थीर केले. त्यांच्या वाढीव कारकिर्दीतली दीड वर्ष अजूनही बाकी आहेत. मात्र यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होऊ पाहणार्‍या इतर अधिकार्‍यांच्या वाट्याला निराशा आली. हे असंतुष्ट माजी अधिकारी बाजवा यांच्या विरोधात हालचाली करीत आहेत. सध्या सेवेत असलेले अधिकारी देखील जनरल बाजवा यांच्यावर नाखूश असून त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जातात. अशा अधिकार्‍यांना जनरल बाजवा यांनी सेवानिवृत्त केले आणि त्यांना आपल्या मार्गातून दूर केले. इतकेच नाही तर सेवानिवृत्तीनंतरचे लाभही या अधिकार्‍यांना जनरल बाजवा यांनी मिळू दिले नाहीत.

यामुळे संतापलेल्या या अधिकार्‍यांनी जनरल बाजवा यांनाच संपविण्याचा कट आखला होता. याचे फार मोठे पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या ऐक्यावर याचा परिणाम होऊ लागला असून जनरल बाजवा व सध्याचे आयएसआयचे प्रमुख जनरल फैज यांच्यातील तणाव वाढत चालल्याचे वृत्त आहे. बाजवा यांच्यानंतर फैज पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनण्यासाठी उत्सुक आहेत व त्यांनी यासाठी पंतप्रधान इम्रान?खान यांच्याबरोबर डील केल्याचे दावे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी केले होते. यामुळेच जनरल बाजवा अस्वस्थ झाल्याची नोंदही भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍याने केली.

यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानी लष्करात संशय व अस्थैर्य माजू शकते व त्याचे फार मोठे परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागू शकतात. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह वरिष्ठ नेते व अधिकार्‍यांच्या सुरक्षेत फार मोठी वाढ करण्यात आली आहे. हफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला जातो. तसेच या स्फोटानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मुख्यालयात पंतप्रधान इम्रान खान, जनरल बाजवा व जनरल फैज यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर जनरल बाजवा तुर्कीच्या दौर्‍यावर निघाले होते.

पाकिस्तानी लष्करातील या घडामोडी आणि अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार व तालिबानची आगेकूच, या गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत, असे दावे सोशल मीडियावर काहीजणांनी केले. आत्तापर्यंत पाकिस्तानने अधिकृत पातळीवर अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेला तळ दिलेला नाही. त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील व सध्या सुरू असलेल्या घडामोडी ही त्याची सुरूवात असल्याचे संकेत पाकिस्तानचे पत्रकार सोशल मीडियावरून देत आहेत.

leave a reply