युरोपिय देशांना इंधनपुरवठ्याची हमी देता येणार नाही

-रशियन कंपनी गाझप्रोमचे स्पष्टीकरण

European-countries-fuel-suppliesमॉस्को – अनपेक्षित घटनाक्रमामुळे युरोपिय देशांना सुरळीत इंधनपुरवठ्याची हमी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण रशियातील आघाडीची कंपनी गाझप्रोमने दिले. गेल्या महिन्यात गाझप्रोनने ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ या इंधनवाहिनीतून करण्यात येणारा इंधनपुरवठा 60 टक्क्यांपर्यंत घटविला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात, देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरता ‘नॉर्ड स्ट्रीम 1’चा पुरवठा 10 दिवस थांबविण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता इंधनपुरवठ्याची हमी नाकारून रशियाने युरोपिय देशांना जबरदस्त धक्का दिल्याचे दिसत आहे.

युरोपिय देशांना करण्यात येणाऱ्या इंधनपुरवठ्यापैकी 30 टक्क्यांहून अधिक इंधनपुरवठा रशियाकडून करण्यात येतो. त्यात कच्चे तेल व कोळशासह नैसर्गिक इंधनवायुचाही समावेश आहे. ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ व यामलसह पाच इंधनवाहिन्यांच्या माध्यमातून इंधनवायुचा पुरवठा करण्यात येतो. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यात अडचणी येण्यास सुरुवात झाली आहे. युरोपिय देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशिया नाराज असून इ्‌ं‍धनपुरवठा रोखून त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इशारे रशियाकडून सातत्याने देण्यात आले होते.

रशियाने अशा स्वरुपाची कारवाई करु नये म्हणून युरोपिय देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर थेट व आक्रमक निर्बंध लादणे टाळले होते. मात्र त्याचवेळी संभाव्य इंधनबंदीची शक्यता लक्षात घेऊन ‘इमर्जन्सी प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू करण्याचे संकेतही दिले होते. रशियाची आघाडीची कंपनी ‘गाझप्रोम’ने पत्र पाठवून इंधनपुरवठ्याची हमी नाकारल्याने युरोपिय देशांना ‘इमर्जन्सी प्लॅन्स’ लागू करणे भाग पडेल, असे मानले जाते.

leave a reply