इराणमध्ये संशयास्पद स्फोट आणि हल्ले सुरूच

तेहरान – इराणच्या फिरोझाबाद येथील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात 133 जण जखमी झाले. यापैकी काही दगावल्याची शक्यता वर्तविली जाते. तर काही तासांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एरोस्पेस विभागातील दोन जवान ठार झाले. इराणची माध्यमे यासाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने तुर्कीमध्ये गेलेल्या इस्रायली नागरिकांसाठी ‘लेव्हल 4’चा उच्च स्तरावरील अलर्ट जारी केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे एजंट्स इस्रायली नागरिक, उद्योजकांना लक्ष्य करतील, अशी शक्यता वर्तवून इस्रायलने हा इशारा दिला आहे.

2020 साली इराणचे प्रमुख शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची राजधानी तेहरानमध्ये गोळ्या घालून हत्या झाली. याच वर्षी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पामध्ये संशयास्पद स्फोट झाला होता. अणुकार्यक्रमाशी संबंधित या दोन्ही घटनांनी इराणला हादरवून सोडले होते. फखरीझादेह यांची हत्या आणि नातांझमधील स्फोटासाठी इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ असल्याचा आरोप इराणने केला होता. तसेच इस्रायलला याची जबर किंमत मोजायला लागेल, असे इराणने धमकावले होते.

गेल्या काही महिन्यांपासून इराणचा अणुकार्यक्रम, लष्कर, रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित अधिकारी तसेच ठिकाणांवर संशयास्पद हल्ले सुरू झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात इराणच्या केरमानशाह येथील रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या गोदामाला आग लागली होती. तर गेल्या महिन्यात कुद्स फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी कर्नल हसन सय्यद खोदाई यांची राहत्या घराजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स, कुद्स फोर्सेसशी संबंधित अधिकारी व जवानांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

चार दिवसांपूर्वी इराणी लष्कराचे पथक रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एरोस्पेस विभागाचे दोन जवान ठार झाले. ड्रोनच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या आपल्या या दोन्ही जवानांच्या मृत्यूबाबत रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स माहिती दडवित असल्याचा दावा केला जातो. आपले जवान वेगवेगळ्या सराव मोहिमांवर असताना शहीद झाल्याचे इराणचे म्हणणे आहे. पण इराणच्या शत्रूंनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांचा बळी घेतल्याा संशय इराणची माध्यमे व्यक्क्त आहेत. याला दोन दिवस उलटत नाही तोच, इराणच्या फार्स प्रांतातील फिरोझाबाद येथील रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली.

येथील एका टँकमध्ये गळती झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची बातमी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. पण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित कारखान्यात दुर्घटना घडली नसून हल्ला झाल्याचा दावा इराणी विश्लेषक करीत आहेत. तर लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच अतिसंवदेनशील ठिकाणांवरील हल्ल्यांमुळे इराण खवळल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. याचा सूड घेण्यासाठी इराण इतर देशांमधील इस्रायलच्या नागरिक व हितसंबंधांवर हल्ले चढवू शकतो. या पार्श्वभूमीवर, इस्रायलने तुर्कीतील आपल्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply