कोरोना रोखण्यासाठी टाकलेल्या निर्बंधांमुळे युरोपला दुहेरी मंदीचा फटका बसेल

- युरोपियन सेंट्रल बँकेसह अर्थतज्ज्ञांचा इशारा

ब्रुसेल्स – युरोपिय महासंघाची अर्थव्यवस्था २०२०सालच्या अखेर तिमाहित मंदावल्याची शक्यता असून येणार्‍या काळातही नकारात्मक कल कायम राहण्याची भीती आहे, असा इशारा युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिन लॅगार्ड यांनी दिला. ‘आयएचएस मार्किट’ या वित्तसंस्थेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ ख्रिस विल्यमसन यांनीही युरोझोनला दुहेरी मंदीचा फटका बसू शकतो, असे बजावले आहे. युरोपात सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असून प्रमुख देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ व इतर कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आलेले हे इशारे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

युरोपात कोरोनाव्हायरसच्या नव्या ‘स्ट्रेन्स’नी हाहाकार उडविला असून इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन, जर्मनी यासारख्या प्रमुख देशांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी या देशांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन व इतर निर्बंध घोषित केले आहेत. त्याचा जबरदस्त फटका या देशांमधील उत्पादन, रिटेल व पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रातील अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले असून, बँकांमधील बुडित कर्जांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

गेल्या वर्षी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून युरोपला बाहेर काढण्यासाठी ७५० अब्ज युरोंच्या ‘रिकव्हरी प्लॅन’ची घोषणा करण्यात आली होती. युरोपियन कमिशनकडून करण्यात आलेली ही घोषणा युरोपच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक पॅकेज मानले जाते. ‘नेक्स्ट जनरेशन ईयु’ असे युरोपीय कमिशनने जाहीर केलेल्या योजनेचे नाव असून ५०० अब्ज युरो अनुदानाच्या रूपात, तर २५० अब्ज युरो कर्ज म्हणून देण्यात येणार होते. त्याव्यतिरिक्त विविध देशांनी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती तसेच अनुदान योजनाही जाहीर केल्या होत्या. मात्र त्याला अपेक्षित गती मिळाली नसल्याने आर्थिक संकटाची व्याप्ती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिन लॅगार्ड यांचे वक्तव्य याची पुष्टी करणारे ठरते. ‘कोरोनाची साथ युरोझोनसह जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका ठरत आहे. साथीचा प्रभाव पुढील काही काळ कायम राहणार असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अर्थव्यवस्थेचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता आहे’, असे लॅगार्ड यांनी बजावले. यावेळी त्यांनी २०२०च्या अखेरच्या तिमाहीत युरोपची अर्थव्यवस्था मंदावल्याचे संकेतही दिले.

आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था ‘आयएचएस मार्किट’चे प्रमुख अर्थतज्ज्ञ ख्रिस विल्यमसन यांनीही युरोपिय अर्थव्यवस्थेला असलेला मंदीचा धोका टाळणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. ‘कोरोनामुळे अनेक देशांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. या निर्बंधांचा मोठा फटका युरोपियन व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात दुहेरी मंदी टाळणे अशक्य ठरते’, असे विल्यमसन यांनी बजावले. ‘आयएचएस मार्किट’कडून औद्योगिक क्षेत्रासंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या अहवालातही मंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. युरोपिय देशांमधील उत्पादनक्षेत्रातील हालचालींचे संकेत देणारा निर्देशांक ४७.५ पर्यंत घसरला आहे. गेल्या महिन्यात त्याची नोंद ४९.१ करण्यात आली होती. गेल्या वर्षी ‘जी-२०’च्या बैठकीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाची तुलना जागतिक महामंदीशी केली होती. तर ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी देशाला ३०० वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीचा फटका बसेल, असे भाकित वर्तविले होते.

leave a reply