कोरोना व बर्ड फ्ल्यूपाठोपाठ चीनमध्ये ‘स्वाईन फिव्हर’ची साथ

- बेकायदा लसींमुळे साथ पसरल्याचा दावा

बीजिंग – कोरोना व बर्ड फ्ल्यूची साथ सुरू असतानाच चीनला ‘स्वाईन फिव्हर’च्या नव्या साथीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१८ व २०१९ अशी सलग दोन वर्षे चीनला ‘स्वाईन फिव्हर’च्या साथीचा फटका बसला होता. २०१९ साली आलेल्या साथीमुळे चीनमधील तब्बल २० कोटी डुकरांची कत्तल करावी लागली होती. नवी साथ चिनी नागरिकांनी वापरलेल्या बेकायदा लसींमुळे पसरल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे समोर येत आहे. चीनने पुन्हा एकदा काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केल्याचेही उघड झाले आहे. चीनच्या शांक्सी प्रांतासह हाँगकाँगमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ आढळल्याची माहितीही स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. त्यापाठोपाठ आलेल्या ‘स्वाईन फिव्हर’च्या साथीने चीनमध्ये खळबळ उडाली आहे.

‘न्यू होप लिउहे’ या कंपनीकडून चालविण्यात येणार्‍या ‘पिग्ज् फार्म्स’मध्ये एक हजारांहून अधिक डुकरामध्ये ‘स्वाईन फिव्हर’चे नवे ‘स्ट्रेन्स’ आढळले आहेत. हा स्ट्रेन प्राणघातक नसला तरी डुकरांच्या शरीरातील अवयवांवर परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने ‘न्यू होप लिउहे’सह इतर कंपन्यांनी अशी डुकरे मारण्यास सुरुवात केली आहे. या नव्या स्ट्रेनच्या उगमामागील नक्की कारण समोर आले नसले तरी काही तज्ज्ञांनी बेकायदा लसींच्या वापराकडे लक्ष वेधले आहे.

स्वाईन फिव्हरवर कोणतीही अधिकृत लस उपलब्ध नाही. मात्र चीनमधील नागरिकांकडून डुकरांना वाचविण्याच्या नादात बेकायदा लसींचा वापर करण्यात येत आहे. त्यातूनच साथीच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात झाली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येते. चीन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील डुकरांचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ओळखण्यात येतो. चीनमधून अमेरिका व युरोपमध्ये डुकरांच्या मांसाची निर्यात होते. या पार्श्‍वभूमीवर नवी साथ लक्ष वेधून घेणारी ठरते.

यापूर्वी २००४-०५ मध्ये बर्ड फ्ल्यूची साथ आली असताना चीनमधील अनेक कंपन्यांनी बेकायदा लसी तयार करून पुरवठा केल्याचे समोर आले होते. त्यातून बर्ड फ्ल्यूचे नवे स्ट्रेन तयार झाल्याचे कालांतराने समोर आले होते.

leave a reply