रुपयाच्या घसरणीची अवाजवी चिंता करण्याची गरज नाही

-केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांची ग्वाही

नवी दिल्ली – मंगळवारीही रुपयाची घसरण कायम राहिली असून डॉलरमागे रुपया 80.05 पर्यंत घसरला. ही विक्रमी घसरण असून देशासाठी चिंतेची बाब असल्याचे इशारे दिले जात आहेत. मात्र याची अवाजवी चिंता करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांनी दिला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झालेली असली तरी ब्रिटिश पौंड, जपानचा येन आणि युरो या चलनाच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वाढले आहे, याकडे अजय सेठ यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी रुपयाची घसरण योग्यरितीने हाताळली जात असून रिझर्व्ह बँकेने यासाठी पावले उचललेली आहेत, असे आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांनी म्हटले आहे.

ajay-sethरुपयाची विक्रमी स्तरावरील घसरण ही फार मोठ्या चिंतेची बाब ठरते. पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाचा इशारा या घसरणीतून मिळत आहे, असे दावे काही विश्लेषकांनी केले आहेत. मात्र डॉलरच्या तुलनेत केवळ भारताच्या रुपयाचीच नाही तर इतर देशांच्या चलनांचीही घसरण झालेली आहे, याकडे काही अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले होते. ब्रिटन, जपान, तसेच युरोझोनचे सामुहिक चलन असलेल्या युरोचीही घसरण झालेली आहे. पहिल्यांदाच युरो डॉलरपेक्षाही कमी दरावर आलेला आहे. आधीच्या काळात असे झाले नव्हते, असे सांगून जगभरातील इतर चलनांच्या दरातील घसरण अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे होत असल्याचे अर्थतज्ज्ञ लक्षात आणून देत आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्याने अमेरिकेचा डॉलर भक्कम झाला. त्यामुळे इतर देशांच्या चलनाचे दर भक्कम झालेल्या डॉलरच्या तुलनेत घसरले. भारताच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांनीही ही बाब लक्षात आणून दिली. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरले असले तरी ब्रिटिश पौंड, जपानचा येन आणि युरो यांच्या तुलनेत रुपयाचा दर वाढलेला आहे, याकडे अजय सेठ यांनी लक्ष वेधले. म्हणूनच रुपयाच्या घसरणीची अवाजवी चिंता करण्याचे कारण नाही. रिझर्व्ह बँकेने ही समस्या हातळण्यासाठी योग्य ती पावले उचललेली आहेत, असे सांगून अजय सेठ यांनी देशवासियांना आश्वस्त केले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने ‘एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोईंग्ज्‌‍-ईसीबी’ची मर्यादा 75 कोटी डॉलसवरून 1.5 अब्ज डॉलर्सवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी देखील डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला असला, तरी ब्रिटिश पौंड, येन आणि युरोच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढलेली आहे, असे राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. तसेच देशाच्या परकीय गंगाजळीचा रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने आढावाघेतला जातो. यातील चढउताराकडे बारकाईने पाहून त्यानुसार योग्य ते निर्णयही रिझर्व्ह बँकेकडून घेतले जातात, असे पंकज चौधरी यांनी म्हटले आहे.

leave a reply