दुर्मिळ खनिजक्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची युरोपिय महासंघाची तयारी

- दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

दुर्मिळ खनिजक्षेत्रातीलब्रुसेल्स/बीजिंग – ‘रेअर अर्थ मिनरल्स’ अर्थात दुर्मिळ खनिजक्षेत्रातील चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपने पावले उचलली आहेत. ‘युरोपियन रॉ मटेरिअल्स अलायन्स’ या गटाने ‘रेअर अर्थ मिनरल्स’ क्षेत्रात दोन अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची शिफारस केली. हा गट युरोपिय महासंघाने स्थापन केला असून सदर गटाने युरोपिय देश दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून असल्याकडेही लक्ष वेधले आहे.

स्मार्टफोन, कॉम्प्युटर्स व इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणार्‍या ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा सर्वात मोठा उत्पादक अशी चीनची ओळख आहे. गेल्या वर्षी ‘रेअर अर्थ मिनरल्स’ बाजारपेठेत चीनचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा होता. याचा वापर चीन राजकीय कारणांसाठी करून जगाची कोंडी करू शकतो, ही बाब विश्‍लेषकांनी याआधी लक्षात आणून दिली होती. चीनच्या या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले असून ‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’ नावाचा उपक्रमही हाती घेतला आहे. यात नऊ देश सहभागी झाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ आता युरोपने देखील या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.

कोरोनाच्या साथीमुळे चीनमधील उत्पादन व त्याचा पुरवठा बाधित झाला होता. या पार्श्‍वभूमीवर जागतिक पातळीवरील ‘सप्लाय चेन मॉडेल’ अर्थात पुरवठा साखळी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युरोपिय महासंघाने ‘युरोपियन रॉ मटेरिअल्स अलायन्स’ची स्थापना केली होती. या गटाने आपला अहवाल शिफारशींसह सादर केला असून त्यात दोन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.

दुर्मिळ खनिजक्षेत्रातील‘रेअर अर्थ मिनरल्स’च्या खाणींपासून ते मॅग्नेटच्या उत्पादनांशी संबंधित १४ योजनांवर भर देण्याची शिफारस युरोपिय गटाने केली आहे. युरोपच्या ‘ग्रीन ऍण्ड डिजिटल ट्रान्झिशन’चा उल्लेख करून त्यासाठी युरोपिय देश मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून असल्याची जाणीव अहवालात करून देण्यात आली आहे. भविष्यात चीन त्यांच्याकडे होणारे ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे उत्पादन प्राधान्याने चिनी उद्योगांसाठीच वापरु शकते, अशी चिंता युरोपिय गटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे युरोपिय देशांनी इतर देशांमधील ‘रेअर अर्थ मिनरल्स’च्या पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे, असे ‘युरोपियन रॉ मटेरिअल्स अलायन्स’ने सुचविले आहे.

युरोपिय गटाचा अहवाल व दोन अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची शिफारस युरोपिय देश आणि चीनमधील संबंध पूर्वीप्रमाणे राहिले नसल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. गेल्याच महिन्यात युरोपच्या संसदेने तैवानबरोबरील संबंध बळकट करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यापूर्वी चीनबरोबरील गुंतवणूक करारालाही स्थगिती दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर चीनकडून होणारी ‘रेअर अर्थ मिनरल्स’ची आयात कमी करण्यासाठी युरोपिय महासंघाने उचललेली ही पावले लक्षवेधी ठरत आहेत.

leave a reply