भारतीय शेअर बाजारात ‘एफपीआय’ची २६ हजार ५१७ कोटींची गुंतवणूक

- उद्योन्मुख बाजारांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक भारतात

मुंबई – फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) अर्थात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर महिन्यात एफपीआयनी भारतीय बाजारात २६ हजार ५१७ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. सलग दुसर्‍या महिन्यात भारतीय शेअर बाजारात एफपीआयची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याचे पहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात एफपीआयने १६ हजार ४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. विकसनशील देशांमध्ये एफपीआयची सर्वाधिक गुंतवणूक भारतीय बाजारात झाली आहे. भारतीय शेअर बाजारातील एफपीआयची गुंतवणूक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढविणारी ठरते. तसेच परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्‍वास वाढल्याचे यातून दिसून येते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

भारतीय शेअर बाजारात ‘एफपीआय’ची २६ हजार ५१७ कोटींची गुंतवणूक - उद्योन्मुख बाजारांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक भारतातदेशात येणारी परकीय गुंतवणूक थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) आणि भांडवली बाजारात एफपीआयच्या अशा दोन स्वरुपात येत असते. दोनच आठवड्यांपूर्वी डेलॉईट सर्व्हेने आपल्या अहवालात परकीय कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. अमेरिका, ब्रिटन, जपान, सिंगापूर सारख्या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेल्या या अहवालात भारतीय बाजारपेठ थेट परकीय गुंतवणूकदारांसाठी आकर्षित करीत असल्याचे स्पष्ट म्हटले होते. तसेच भारताला ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी एफडीआय महत्त्चाचा असेल, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. वाणिज्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या माहितीनुसार सुरू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात भारत २७.३७ अब्ज डॉलर्सचा एफडीआय आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये ११२ टक्क्यांची वाढ दिसून आली होती.

एफडीआयबरोबर एफपीआय गुंतवणूकही भारतात वाढत आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारात एफपीआयने केलेल्या गुंतवणुकीचे आकडे समोर आले असून एफपीआयनी एकूण २६ हजार ५१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील १३ हजार १५४ कोटी रुपयांची गुंतवणूक ही निरनिराळ्या कंपन्यांच्या समभागात, तर १३ हजार ३६३ कोटी रुपयांची गुंतवणूक ही विविध कर्जरोख्यांमध्ये झाली आहे. जगातील सर्वच उद्योन्मुख बाजारांमध्ये एफपीआयने सप्टेंबर महिन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र या उद्योन्मुख बाजारांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक भारतात झाली आहे. दक्षिण कोरियातील भांडवली बाजारात ८८.४ कोटी डॉलर्स, थायलंडमध्ये ३३.८ कोटी डॉलर्स, इंडोनेशियामध्ये ३०.५ कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक एफपीआयने केली आहे. तेच भारतात ३५७ कोटी डॉलर्सहून अधिकची (२६ हजार कोटी रुपयाहून) गुंतवणूक आली आहे.

भारतीय बाजारातील या गुंतवणुकीवरून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार छोट्या काळाचा विचार न करता दीर्घ काळाचा विचार करीत असल्याचे दिसून येते, असा मत विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच भारतीय बाजारावर एफपीआयचा विश्‍वास वाढल्याचेही यातून अधोरेखित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply