रशियाने ब्रिटीश युद्धनौका बुडविल्यानंतरही तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडाला नसता – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा दावा

ब्रिटीश युद्धनौकामॉस्को – क्रिमिआच्या सागरी हद्दीजवळून जाणारी ब्रिटीश युद्धनौका रशियाने बुडविली असती तरी त्यावरून तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता नव्हती, असा टोला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लगावला आहे. त्याचवेळी ब्रिटीश युद्धनौकेने रशियाच्या हद्दीतून केलेला प्रवास ही चिथावणीच होती, असा ठपकाही पुतिन यांनी ठेवला.

गेल्या आठवड्यात, ब्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास केला होता. त्यावेळी रशियन गस्तीनौकांनी ब्रिटीश युद्धनौकेचा पाठलाग करून ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडले होते. रशियाच्या लढाऊ विमानांनी ब्रिटीश युद्धनौकेला रोखण्यासाठी समुद्रात बॉम्ब टाकले होते, असा दावाही रशियन संरक्षणदलाने केला होता. मात्र ब्रिटनने यासंदर्भातील रशियाचे सर्व दावे फेटाळून लावले होते.

ब्रिटीश युद्धनौकाया प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘रशियाने बॉम्ब टाकून ब्रिटनची युद्धनौका बुडविली असती तरी त्याने तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडाला नसता. ज्यांनी हे प्रकरण घडवून आणले ते देश अशा युद्धात कधीच जिंकू शकत नाहीत आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते’, असा टोला पुतिन यांनी लगावला. पुतिन यांचा हा टोला नाटो व नाटोच्या ‘कलेक्टिव्ह डिफेन्स’ धोरणाला होता, असा दावा रशियन माध्यमांनी केला आहे.

ब्रिटीश युद्धनौकानाटोला फटकारतानाच पुतिन यांनी क्रिमिआच्या चिथावणीमागे अमेरिकेचा हात असल्याचाही आरोप केला. बुधवारी ब्रिटीश युद्धनौकेने क्रिमिआच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी अमेरिकेच्या विमानाने क्रेटेमधील तळावरून ब्लॅक सीच्या दिशेने उड्डाण केले होते, असा दावा पुतिन यांनी केला. ब्रिटीश युद्धनौकेच्या क्रिमिआतील मोहिमेसंदर्भातील काही गोपनीय कागदपत्रे ब्रिटनमधील एका बसमध्ये आढळल्याचे समोर आले होते. पुतिन यांनी अमेरिकेच्या सहभागासंदर्भात केलेला दावा व ब्रिटनमध्ये गोपनीय कागदपत्रे सापडणे या घटनांमुळे क्रिमिआच्या हद्दीत रशिया व ब्रिटनमध्ये उडालेल्या कथित चकमकीसंदर्भातील गूढ अधिकच वाढले आहे.

दरम्यान, क्रिमिआत घडलेल्या घटनेनंतर नाटो व युक्रेनने ब्लॅक सी सागरी क्षेत्रात ‘सी ब्रीझ 2021’ युद्धसरावाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. या युद्धसरावात नाटोचे सदस्य देश व युक्रेनचे पाच हजार जवान सहभागी झाले आहेत. हा सराव सुरू झाल्यानंतर रशियाने क्रिमिआत ‘एस-400’ या प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणेची चाचणी घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत.

ब्रिटनची युद्धनौका रशियाने बुडविल्यानंतरही युद्ध भडकले नसते, हा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केलेला दावा म्हणजे मानसिक दबावतंत्राचा भाग असल्याचे दिसते. प्रत्यक्षात अमेरिका, ब्रिटन व नाटोच्या इतर सदस्य देशांबरोबरील रशियाचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत आणि त्यातून संघर्ष पेट घेऊ शकतो, अशी चिंता जबाबदार विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. रशियाबरोबर इंधनविषयक सहकार्यासाठी पुढाकार घेणार्‍या जर्मनीतून देखील रशियाच्या आक्रमक धोरणांचे परिणाम दिसू लागले आहेत. आपल्याकडून युद्धाचा भडका उडू नये, यासाठी सर्वच देश सावधपणे कारवाया करीत आहेत. रशियाने देखील ब्रिटनच्या युद्धनौकेला थेट लक्ष्य न करता त्याच्या बाजूला बॉम्ब टाकले होते, ही बाब लक्षवेधी ठरते. मात्र ही ब्रिटनवरील आपली लष्करी कुरघोडी होती, हे दाखवून रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन नाटोच्या विरोधात मानसिक युद्धतंत्राचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply