अमेरिका व कॅनडात ‘हिटवेव्ह’चे 100 हून अधिक बळी

100 हून अधिकवॉशिंग्टन/ओटावा – अमेरिका व कॅनडाला उष्णतेच्या लाटेचा जबरदस्त फटका बसला असून, त्यात 100 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात विक्रमी 49.5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून गेल्या 100 वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. पॅसिफिक क्षेत्रात ‘डोम ऑफ हाय प्रेशर’ निर्माण झाल्यामुळे अमेरिका व कॅनडात उष्णतेची लाट आल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हंटले आहे.

100 हून अधिकपॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘पॅसिफिक नॉर्थवेस्ट’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागात जून महिन्यात सर्वसाधारण तापमान 11 ते 20 डिग्री सेल्सियस इतके असते. मात्र गेल्या काही दिवसात या भागामधील तापमान 35 डिग्री सेल्सियस व त्याहून अधिक नोंदविण्यात येत आहे. अमेरिकेतील ‘ओरेगॉन-वॉशिंग्टन’ सीमा भागात 48 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे ओरेगॉनमध्ये तिघांचा तर वॉशिंग्टमध्ये चारजणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, नेवाडा, इदाहो, ओरेगॉन व वॉशिंग्टन स्टेट या भागांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला असून शेकडो नागरिकांनी सरकारी ‘शेल्टर्स’चा आश्रय घेतला आहे. ही ‘हिटवेव्ह’ अजून आठवडाभर कायम राहिल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया, अल्बर्टा, युकॉन व नॉर्थवेस्ट टेरिटरीज् या प्रांतांना उष्णतेच्या लाटीचा फटका बसला आहे. ब्रिटीश कोलंबियातील लिटन या भागात विक्रमी 49.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हे आतापर्यंत कॅनडात नोंदविण्यात आलेले सर्वोच्च तापमान असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कॅनडातील अनेक भागांमध्ये 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

या उष्णतेच्या लाटेमुळे ग्रेटर व्हँकोव्हर भागात चार दिवसात जवळपास 134 जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. उष्णतेच्या लाटेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लाटेमुळे ब्रिटीश कोलंबिया भागात वणवे भडकले असून पुढील काळात त्यांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये शेतातील पिके जळाल्याचीही माहिती समोर आली आहे.

leave a reply