तालिबानबरोबरील सहकार्याची पाकिस्तानला जबर किंमत मोजावी लागेल – अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा इशारा

काबुल – ‘पाकिस्तानने यापुढेही तालिबानला सहकार्य देणे सुरू ठेवले, तर त्याची जबर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल’, असा सज्जड इशारा अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी दिला. तालिबानसह सहकार्य करणार्‍या पाकिस्तानबाबत आपला संयम संपत असल्याचे संकेत अफगाणिस्तान यातून देत आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेच्या दौर्‍यावरून परतल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला. काही तासांपूर्वी अफगाणिस्तानने ड्युरंड सीमेवर होणार्‍या तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराच्या तस्करीवर हवाई हल्ले चढविण्याचे जाहीर केले होते.

जबर किंमत‘अगदी स्थापनेपासून तालिबानला आश्रय देणारा पाकिस्तान या संघटनेबरोबरच्या शांतीचर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. यामुळे अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित झाली तर पाकिस्तान अफगाणिस्तानचा विश्वासू सहकारी देश बनेल. इतर सर्व देशांना अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारबरोबर चांगले संबंध हवे आहेत, पण या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश नाही’, अशी टीका अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना केली.

अफगाणिस्तानात लष्कर आणि तालिबानमधील संघर्ष तीव्र झाला आहे. तालिबानने गेल्या दोन महिन्यांमध्ये किमान 64 जिल्ह्यांचा ताबा घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संघटनांनी केला. तालिबानच्या या लष्करी मुसंडीसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप तीव्र होत असून यासंबंधीचे पुरावे समोर येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात याबाबतची महत्त्वाची माहित समोर आली.

जबर किंमत‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लश्कर-ए-तोयबा’ या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना तालिबानच्या साथीने अफगाण लष्कराविरोधात संघर्ष करीत असल्याचे राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे. या संघर्षासाठी पाकिस्तानचे लष्कर तालिबानला प्रशिक्षण देत आहे. त्याचबरोबर, पाकिस्तानी लष्कराचे जवान देखील तालिबानच्या दहशतवाद्यांच्या साथीने या युद्धात लढत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. अफगाणी लष्कराने तालिबानविरोधी कारवाईत ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या जवानाने ही माहिती उघड केली होती. पाकिस्तानचे नेते देखील स्थानिक माध्यमांसमोर तालिबानला आपल्या देशाकडून सहकार्य केले जात असल्याची कबुली देत आहेत.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावत, लोइ बेर, बारा कहूह आणि तारनोल या भागांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचे परिवार स्थायिक असल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशिद यांनी दोन दिवसांपूर्वी मान्य केले. अफगाणिस्तानातील संघर्षात जखमी झालेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांवरील उपचार देखील येथील स्थानिक रुग्णालयांमध्येच होत असल्याचे शेख रशिद म्हणाले होते. त्याचबरोबर, अफगाणी लष्कराकडून लुटलेले रणगाडे, लष्करी वाहने व इतर शस्त्रसाठा तालिबान सीमेपलिकडे पाकिस्तानी लष्कराला सोपवित असल्याच्या बातम्या येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानला तालिबानबरोबरच्या सहकार्याची जबर किंमत चुकवावी लागल्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली होती. तेव्हा उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील उपस्थित होते. त्यानंतर मायदेशी परतलेल्या उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानला दिलेला इशारा म्हणजे अमेरिकेने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दिलेली समज असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली असून पाकिस्तानने आता चीन व रशिया आणि इराण या देशांचे सहाय्य घेऊन अमेरिकेच्या दडपणाला तोंड द्यावे, असे सल्ले काही सामरिक विश्‍लेषक पाकिस्तानला देत आहेत.

leave a reply