इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या 24 जणांना फाशीची शिक्षा

फाशीची शिक्षाकैरो – इजिप्तच्या न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या 24 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये इजिप्शियन पोलीस अधिकार्‍यांच्या हत्येचा आरोप ब्रदरहूडच्या सदस्यांवर होता. चार महिन्यांपूर्वी इजिप्तच्या न्यायालयाने या संघटनेच्या इतर काही सदस्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावली होती. इजिप्तच्या सरकारने मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

राजधानी कैरो येथील दमनहूर न्यायालयाने सहा वर्षांपूर्वीच्या आरोपांवर आपला निकाल जाहीर केला. 2014 साली अद दिलिंजात शहरात पोलीस अधिकार्‍याचा खून आणि 2015 साली राशिद शहरात फाशीची शिक्षापोलिसांच्या बसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा आरोप या 24 जणांवर सिद्ध झाला होता. या दोन्ही हल्ल्यांमध्ये तीन पोलीस अधिकार्‍यांचा बळी गेला तर 39 जण जखमी झाले होते.

याप्रकरणी इजिप्तच्या सुरक्षा यंत्रणेने 27 आरोपींना अटक केली होती. यापैकी तिघांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तर उर्वरित 24 जण दोषी असल्याचे सिद्ध करून इजिप्तच्या न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. एप्रिल महिन्यातही इजिप्तच्या न्यायालयाने इतर 10 जणांना अन्य गंभीर गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी इजिप्तच्या न्यायालयाने वेगवेगळ्या घटनांमध्ये 107 जणांना मृत्यूदंड ठोठावला होता.

फाशीची शिक्षाइजिप्तसह सौदी अरेबिया, युएई, बाहरिन, सिरिया या आखाती देशांमध्ये तर रशिया आणि ताजिकिस्तान व कझाकस्तान या देशांमध्ये मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. 2011 साली इजिप्तमधील होस्नी मुबारक यांची राजवट उलथून लावत मुस्लिम ब्रदरहूडने इजिप्तचा ताबा घेतला होता. त्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आणि ब्रदरहुडचे नेते मोहम्मद मोर्सी यांनी या संघटनेवरील बंदी मागे घेतली. पण दीड वर्षातच इजिप्तच्या लष्कराने बंड करून ब्रदरहूडची सत्ता उधळून लावली व या संघटनेचे नेते व सदस्यांची धरपकड सुरू केली होती.

या संघटनेच्या नेत्यांचे अल कायदा, हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांबरोबर संबंध होते. त्यामुळे या संघटनेचे नेते व सदस्यांवर होणारी कारवाई योग्यच ठरते, असे इजिप्तच्या सरकारचे म्हणणे आहे. पण स्थानिक मानवाधिकार संघटना आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संघटना मुस्लिम ब्रदरहूडवरील नेत्यांवर तसेच कार्यकर्त्यांवर होणार्‍या कारवाईवर टीका करीत आहेत.

leave a reply