भूमध्य क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, जॉर्डन व सायप्रसचा तुर्कीला इशारा

ग्रीस, जॉर्डनअथेन्स/अंकारा – भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, जॉर्डन व सायप्रसने तुर्कीला नवा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा ठराव व आंतरराष्ट्रीय कायद्यांपलिकडे जाऊन तुर्कीने सायप्रसच्या प्रकरणात हस्तक्षेप करु नये, असे तिन्ही देशांनी बजावले आहे. तुर्कीने ‘नॉर्दर्न सायप्रस’मधील वादग्रस्त भाग पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला. तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी नुकतीच या भागाला भेटही दिल्याचे समोर आले आहे. तुर्कीच्या या कारवायांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ग्रीस, जॉर्डन व सायप्रसची बैठकही त्याचाच भाग मानला जातो.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगितला आहे. ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली तैनाती वाढविली होती.

ग्रीस, जॉर्डनत्याचवेळी दुसर्‍या बाजूला तुर्कीच्या कारवायांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्यासाठीही ग्रीसने वेगाने पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात ग्रीसच्या सरकारने फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला आहे. जॉर्डनबरोबर आयोजित केलेली त्रिपक्षीय बैठक यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जॉर्डनबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी ग्रीसने 2018 सालापासून प्रयत्न सुरू केले होते. अथेन्समध्ये आयोजित करण्यात आलेली बैठक या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संकेत देणारी ठरते.

1974 साली तुर्कीने सायप्रसवर आक्रमण करून काही भाग ताब्यात घेतला होता. या मोहिमेची आठवण म्हणून तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, 20 जुलै रोजी ‘सायप्रस’मधील तुर्कीश भागाला भेट दिली होती. या भेटीत सायप्रसमधील वादग्रस्त भाग असलेल्या ‘घोस्ट टाउन वरोशा’ पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले होते. तुर्की यंत्रणांनी त्यासाठी हालचालीही सुरू केल्याचे सांगण्यात येते. तुर्कीच्या या हालचालींमुळे अस्वस्थ झालेल्या ग्रीस व सायप्रसने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून तुर्कीवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जॉर्डनचे प्रमुख ‘किंग अब्दुल्लाह दुसरे’ यांच्याबरोबर झालेली बैठक व संयुक्त निवेदन त्याचाच भाग ठरतो. या निवेदनात सायप्रसच्या मुद्याबरोबरच भूमध्य सागरी क्षेत्रातील हालचालींवरूनही तुर्कीला इशारा देण्यात आला आहे. ‘शांततापूर्ण, स्थिर व समृद्ध भूमध्य क्षेत्र या भागातील सर्व देशांच्या हिताचे असून धोरणात्मकदृष्ट्या त्यालाच प्राधान्य रहायला हवे’, असे ग्रीस, जॉर्डन व सायप्रसने बजावले आहे.

leave a reply