‘कोव्हॅक्सिन’च्या लहान मुलांवरील ‘क्लिनिकल’ चाचण्यांना तज्ज्ञ समितीची मंजुरी

- ‘डीसीजीआय’ने अंतिम मंजुरी दिल्यावर दोन ते १८ वयोगटातील मुलांवर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू होणार

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणावर लहान मुलांना संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुले आणखी मोठ्या प्रमाणावर बाधीत होतील, अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे लहान मुलांना लसींचे संरक्षण कसे मिळेल अशा चिंता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आता लवकरच लहान मुलांसाठीही लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कारण ‘कोव्हॅक्सिन’ बनविणारी भारत बायोटेक ही लस मुलांना देता येईल का? हे तपासण्यासाठी लवकरच ‘क्लिनिकल’ चाचण्यांना सुरूवात करण्याची शक्यता आहे. ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’च्या (डीसीजीआय) तज्ज्ञ समितीने या चाचण्यांना मंजुरी दिली आहे. आता ‘डीसीजीआय’कडून या चाचण्यांसाठी अंतिम मान्यता मिळाल्यानंतर या चाचण्या सुरू होतील, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

‘कोव्हॅक्सिन’च्या लहान मुलांवरील ‘क्लिनिकल’ चाचण्यांना तज्ज्ञ समितीची मंजुरीआतापर्यंत भारतात कोरोनावरील कोणतीही लस लहान मुलांसाठी उपलब्ध नाही. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच फायजर-बायोटेकच्या लसीला अमेरिकेच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे. ही लस तेथे १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना दिली जात आहे. मात्र भारत बायोटेक २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर चाचण्या घेणार आहे. याआधी प्रयोगशाळेत यासंदर्भात चाचण्या पार पडल्या आहेत. तर दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील ‘क्लिनिकल’ चाचण्यांसाठी भारत बायोटेकने ‘डीसीजीआय’कडे परवानगी मागीतली होती. यावर ‘डीसीजीआय’च्या तज्ज्ञ समितीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी-एसईसी) विस्तृत चर्चा केल्यावर लहान मुलांवर या लसींच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली व तशी शिफारस ‘डीसीजीआय’कडे केली आहे.

‘डीसीजीआय’कडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर या चाचण्या सुरू होतील. ‘एसईसी’ने केलेल्या शिफारसीअंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तिसर्‍या टप्प्यातील ‘क्लिनिकल’ चाचण्या सुरू करण्याआधी दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष व डाटा उपलब्ध करून द्यावा लागेल. तज्ज्ञ समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांवर या ‘कोव्हॅक्सिन’च्या चाचण्या घेण्यासाठी दिलेल्या मंजुरीनंतर या चाचण्या लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (एम्स) डिपार्टमेंट ऑफ मेडिसीनचे डॉ. संजिव सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास देशात लहान मुलांसाठीही ‘कोव्हॅक्सिन’ लस उपलब्ध होईल.

दरम्यान, देशात ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन जूनपर्यंत दुप्पट होण्याची, तर जुलै ऑगस्टपर्यंत ५ पटीने वाढण्याची शक्यता केली जाते. ऑगस्टपर्यंत महिन्याला ‘कोव्हॅक्सिन’च्या १० कोटी लसींचे उत्पादन घेतले जाईल. गेल्या महिन्यातच ‘हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ आणि ‘भारत इम्युनोलॉजिकल्स व बायोलॉजिक्स लिमिटेड’ या तीन संस्थांनाही तंत्रज्ञान हस्तांतरणाअंतर्गत ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन घेण्यास सरकारने परवानगी दिली होती. याशिवाय भारत बयोटेकही आपल्या हैदराबाद आणि बंगळूरुमधील प्रकल्पांची क्षमता वाढवित आहे.

leave a reply