संघर्षबंदीपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानतील दोन महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेतला

संघर्षबंदीपूर्वीकाबुल – गुरुवारपासून सुरू होणार्‍या संघर्षबंदीपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानमधील दोन महत्त्वाच्या भागांचा ताबा घेतला. बुधवारी राजधानी काबुलपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असणार्‍या ‘नर्ख’ जिल्ह्यावर तालिबानने ताबा मिळविल्याचे जाहीर करण्यात आले. राजधानी काबुलचे प्रवेशद्वार म्हणून ओळखण्यात येणार्‍या नर्खवरील ताबा ही तालिबानकडून काबुलवर होणार्‍या हल्ल्याचे संकेत असू शकतात, अशी भीती विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे फर्स्ट व्हाईस प्रेसिडंट अमरुल्लाह सालेह यांनी, तालिबानला अमेरिकेनेच अधिकृतता बहाल केलेली आहे, अशी नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अफगाणिस्तानमधील आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या ज्यो बायडेन यांनीही सैन्यमाघारीचा निर्णय कायम ठेवला. मात्र मे महिन्याऐवजी सप्टेंबर महिन्यापर्यंत माघारी पूर्ण होईल, असे जाहीर केले. अमेरिका व नाटो देशांच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेची माघारी सुरू असताना तालिबानकडून करण्यात येणार्‍या आक्रमक कारवाया व हिंसाचार त्याला दुजोरा देत आहे.

संघर्षबंदीपूर्वीअमेरिकेच्या माघारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तालिबानने आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. तालिबानकडून अफगाणी लष्कर, सुरक्षायंत्रणा, सरकारी कार्यालये, शिक्षणसंस्था यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानातील अधिकाधिक भागावर ताबा मिळविण्यासाठीही तालिबानचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात तालिबानने बागलान प्रांतातील बर्का जिल्ह्यावर ताबा मिळविला होता. त्यानंतर आता राजधानी काबुलजवळ असणार्‍या नर्ख जिल्ह्यावर ताबा मिळवून तालिबानने आपले इरादे स्पष्ट केले.

संघर्षबंदीपूर्वीस्थानिक सुरक्षा यंत्रणा तसेच लष्करी तुकड्यांनी नर्खमधून माघार घेतल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने दिली. मात्र ही माघार ‘टॅक्टिकल रिट्रिट’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नर्खवरील ताब्यासाठी लवकरच मोहीम हाती घेतली जाईल, असे म्हटले आहे. तालिबानकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय व लष्करी तळ ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, तालिबानला अमेरिकेनेच अधिकृतता बहाल केल्याची टीका अफगाणिस्तानचे फर्स्ट व्हाईस प्रेसिडंट अमरुल्लाह सालेह यांनी केली आहे. अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, दोहा करार हा अमेरिका व तालिबानमध्ये झालेला करार असल्याने तालिबान पुढे जे काही करील त्याला अमेरिकाच जबाबदार असेल, असा ठपका सालेह यांनी ठेवला.

‘अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या निर्णयाचा अफगाणिस्तान आदर करतो. पण तरीही आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या व धोरणात्मकदृष्ट्या अमेरिका अफगाणिस्तानशी असणारे सहकार्य कायम ठेवेल’, अशी अपेक्षा यावेळी सालेह यांनी व्यक्त केली.

leave a reply