दुबईच्या बंदरात कंटेनर जहाजात स्फोट – कंटेनरमधील ज्वलनशील पदार्थामुळे दुर्घटना

स्फोटदुबई – जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले दुबईचे ‘जबेल अली’ बंदर बुधवारी कानठळ्या बसणार्‍या स्फोटाने हादरले. येथे नांगर टाकलेल्या एका जहाजातील कंटेनरमध्ये शक्तीशाली स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. कंटेनरमधील ज्वलनशील पदार्थामुळे हा स्फोट झाल्याचा दावा स्थानिक यंत्रणांनी केला. पण जगातील सर्वात महत्त्वाचे मालवाहतूक करणारे आणि दुबईची जीवनवाहिनी असणार्‍या या बंदरातील या दुर्घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. गेल्या दोन वर्षात युएई, सौदी अरेबिया, ओमानच्या सागरी क्षेत्रात परदेशी मालवाहू व इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, जबेल अली बंदरात झालेल्या स्फोटाबाबत संशयाचे धुके पसरल्याचे दिसत आहे.

‘संयुक्त अरब अमिरात-युएई’चे सर्वात गजबजलेले शहर दुबईमध्ये बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज 22 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या स्फोटामुळे आपल्या इमारती व घरांना याचा कंप जाणवल्याचा दावा काही रहिवाशांनी केला. जबेल अली बंदरात नांगर टाकलेल्या एका परदेशी जहाजातील कंटेनरमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

स्फोटया स्फोटात व त्यानंतर भडकलेल्या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे येथील सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. आग भडकल्यानंतर जहाजातील सर्व कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. कंटेनरमधील ज्वलनशील पदार्थामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता स्थानिक यंत्रणांनी व्यक्त केली. उन्हाळ्याच्या काळात अशा घटना घडत असतात, असे सांगून दुबईच्या यंत्रणांनी यावर बोलण्याचे टाळले. तसेच या आगीत झालेल्या नुकसानाचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.

स्फोटगुरुवारी सकाळपर्यंत या जहाजाला लागलेली आग विझविण्यात यश मिळाले. तसेच जबेल अली बंदरातील इतर जहाजांची रेलचेलही नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे युएईचे ऊर्जा आणि बांधकाममंत्री सुहेल अल-मझरोई यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे दुबईच्या सागरी क्षेत्रातील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे मझरोई यांनी स्पष्ट केले.

भारतीय उपखंड, आफ्रिका आणि आशियाई देशांमधून येणार्‍या मालवाहू जहाजांसाठी जबेल अली हे बंदर अतिशय महत्त्वाचे ठरते. या बंदरावर जगातील सर्वात मोठी कंटेनर जहाजे उभी करण्यासाठी चार मोठे टर्मिनल्स आहेत. आखातातील सर्वात व्यस्त बंदर म्हणूनही जबेल अलीकडे पाहिले जाते. अशा या बंदरात झालेल्या या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात युएईच्या सागरी क्षेत्रात प्रवेश करणार्‍या एका मालवाहू जहाजावर रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे इराण असल्याचा संशय इस्रायली माध्यमांनी वर्तविला होता. इस्रायल आणि इराणमधील छुप्या युद्धाचा हा एक भाग असल्याचा दावा केला जातो. याशिवाय इस्रायल आणि युएईमध्ये प्रस्थापित झालेले सहकार्य इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना मान्य नाही. यावरून इराणने युएईला उघडपणे धमक्या दिल्या होत्या.

leave a reply