सिरियन किनारपट्टीजवळ ऑईल टँकरवर स्फोट

दमास्कस – सिरियाच्या बनियास बंदराजवळच्या सागरी क्षेत्रात उभ्या असलेल्या ऑईल टँकरवर रविवारी संशयास्पद स्फोट झाला. टँकरवरील या स्फोटाच्या काही तास आधी सिरियाच्या होम्स प्रांतातील सर्वात मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पातही आगीचा भडका उडाला होता. या दोन्ही घटनांमध्ये आग विझविण्यात यश मिळाल्याचे सिरियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पाश्‍चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे सिरियामध्ये इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. इराणकडून सिरियाला इंधनाची तस्करी केली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून इराणच्या इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

सिरियन किनारपट्टीजवळ ऑईल टँकरवर स्फोटपाश्‍चिमात्य देशांनी सिरियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यामुळे सिरियाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार ठप्प झाले असून इतर देशांमधून मिळणारा इंधनपुरवठाही बाधित झाला आहे. अस्साद राजवटीला पाठिंबा देणार्‍या इराणकडून सिरियाला इंधनाची तस्करी केली जाते. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणलाही इतर देशांना उघडपणे इंधनाचा पुरवठा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत इराणकडून सिरियाला होणारा इंधनाचा पुरवठा म्हणजे चोरट्या मार्गाने होत असलेला व्यवहार ठरतो. इराणकडून मिळणार्‍या इंधनाचा साठा सिरियाने होम्स इंधन प्रकल्प आणि बनियास बंदरातील प्रकल्पात केला होता. होम्स प्रकल्पातून दिवसाला एक लाख १० हजार बॅरल्स तर बनियास बंदरातील प्रकल्पातून एक लाख ३० हजार बॅरल्स इंधनाचा पुरवठा केला जातो. पण गेल्या काही दिवसांमध्ये इंधन वाहून नेणार्‍या इराणच्या टँकर्सवर हल्ले वाढल्यामुळे होम्स आणि बनियास बंदरातील इंधनाच्या साठ्यात घट झाली आहे.

अशा परिस्थितीत, रविवारी अवघ्या काही तासांच्या अंतराने होम्सच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पात आणि बनियास बंदराजवळ तैनात ऑईल टँकरवर दुर्घटना घडली. होम्स प्रकल्पातील पंपिंग स्टेशनमध्ये इंधनगळती झाल्यामुळे आग भडकल्याचा दावा सिरियन वृत्तवाहिनीने केला. तसेच या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. तर बनियास बंदरापासून जवळच तैनात असलेल्या ऑईल टँकरवर स्फोट होऊन आग लागली. सिरियन अधिकार्‍यांनी इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा स्फोट होऊन आग भडकल्याचे म्हटले आहे.

पण एकाच दिवशी सिरियातील दोन मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पांच्या हद्दीत आग भडकण्याच्या घटनेमागे घातपात असल्याचा संशय काही माध्यमे व्यक्त करीत आहेत. याआधी जानेवारी महिन्यातही होम्स प्रकल्पाच्या बाहेर इंधनवाहू टँकरचा स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. तर रविवारी बनियास बंदराजवळ तैनात जहाजातील इंजिनमधील बिघाडामुळे हा स्फोट झाल्याचा दावा सरकारी वृत्तवाहिनीने केला. याच जहाजावर आग भडकण्याची ही दुसरी घटना आहे.

गेल्या महिन्यात या जहाजावर पहिल्यांदा आग भडकली होती. यासाठी सिरियन माध्यमांनी इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यांना जबाबदार धरले होते. मात्र रविवारच्या हल्ल्यांसाठी सिरियन सरकारने इस्रायलवर आरोप केलेला नाही.

leave a reply