पाकिस्तानी क्षेपणास्त्राच्या ‘यशस्वी चाचणीचे’ अपयश जगजाहीर

- क्षेपणास्त्र नागरी वस्तीत कोसळल्याचे उघड

इस्लामाबाद – पाकिस्तानने बुधवारी आपल्या ‘शाहिन-३’ या अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या व सुमारे २७५० किलोमीटर इतका पल्ला असणार्‍या या क्षेपणास्त्राच्या ‘यशस्वी’ चाचणीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या संशोधकांचे अभिनंदनही केले होते. पण प्रत्यक्षात ही चाचणी अपयशी ठरली असून हे क्षेपणास्त्र नियोजित ठिकाणी मारा न करता त्याआधीच बलोचिस्तानच्या डेरा बुग्ती येथील नागरी वस्तीत कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. बलोचिस्तानातील एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली दिली. कोसळलेल्या क्षेपणास्त्रामुळे काहीजण जखमी झाले आहेत व इथल्या घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लष्कारने शाहिन-३ च्या चाचणीला मोठे यश मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर, समोर आलेली ही माहिती लपविणे पाकिस्तानसाठी अवघड बनले आहे. सध्या पाकिस्तानच्या सरकारला सर्वच पातळ्यांवरील अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. भाडेतत्वावर घेतलेल्या विमानाचे पैसे चुकते केले नाहीत, म्हणून पाकिस्तानी एअरलाईन्सचे विमान मलेशियाच्या विमानतळावर जप्त करण्यात आले होते. या घटनेला काही दिवस उलट नाही तोच पाकिस्तानात इम्रान खान यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे नवे आरोप सुरू झाले आहेत. परदेशातून आलेले पैसे इम्रान खान व त्यांच्या सहकार्‍यांना मिळालेले आहेत, पण त्यांनी याची माहिती उघड करण्याचे टाळले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे सरकार व लष्कराने ‘शाहिन-३’ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र ही चाचणी अपयशी ठरली असून डेरा बुग्ती येथील एका रहिवाशी वस्तीत ‘शाहिन-३’ कोसळले. यामुळे काहीजण जखमी झाले असून इथल्या घरांची नासधूस झाल्याची माहिती बलोच पिपल्स रिपब्लिक नावाच्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली. इतकेच नाही तर जखमी झालेल्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलेले नाही, असे या पक्षाचे प्रवक्ते शेर मोहम्मद यांनी म्हटले आहे. तसेच हे क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने या भागाचा ताबा घेतल्याची माहिती शेर मोहम्मद यांनी दिली. पाकिस्तानने बलोचिस्तानची प्रयोगशाळा बनविली असून अशा घातक चाचण्यांसाठी पाकिस्तान नेहमीच बलोचिस्तानचा वापर करीत आला आहे, असा आरोप शेर मोहम्मद यांनी केला आहे.

इतर बलोच कार्यकर्तेही यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या चाचणीचे अपयश लपवून उलट ही चाचणी यशस्वी ठरल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या खोट्या दाव्यांचा यामुळे पर्दाफाश झाला आहे. मात्र याबाबतची माहिती माध्यमांमध्ये येऊन आपली अधिक नाचक्की होऊ नये, यासाठी पाकिस्तानचे सरकार धडपडत आहे. अमेरिकेत ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना, त्यांचे लक्ष वेधून घेण्याची केविलवाणी धडपड ‘शाहिन-३’ची चाचणी करून पाकिस्तानने केल्याचीही चर्चा सुरू आहे. याबरोबरच पाकिस्तानच्या जनतेचे सरकारच्या अपयशाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठीही या चाचणीचा वापर करण्याचा डाव पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने आखला असावा, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

म्हणूनच या चाचणीचे अपयश पाकिस्तानच्या सरकार व लष्कराच्या विरोधातील नाराजी अधिकच तीव्र करणारे ठरू शकते. याची जाणीव झालेल्या पाकिस्तानच्या लष्कराने हे अपयश लपविण्यासाठी वेगाने हालचाली करून याची बातमी फुटू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे उघड होत आहे.

leave a reply