जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना देशासमोरील सुरक्षाविषयक आव्हाने वाढली आहेत

- लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा इशारा

नवी दिल्ली – ‘आशियात उदयाला येत असलेली जागतिक शक्ती म्हणून भारताकडे पाहिले जाते. अशा काळात देशासमोरील सुरक्षाविषयक आव्हानांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या आव्हानांना तोंड देत असताना, भारत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच देशातील शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या निर्मितीच्या उद्योगाचा विकास अत्यंत आवश्यक ठरतो’, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी म्हटले आहे.

‘सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स’ या देशांतर्गत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादात लष्करप्रमुख बोलत होते. ‘आर्मी-इंडस्ट्री पार्टनरशिप’ या विषयावर बोलताना लष्करप्रमुखांनी देशांतर्गत शस्त्रास्त्रांची निर्मिती तसेच या क्षेत्रातील संशोधनाला फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे, याची जाणीव करून दिली. नव्या काळात भारताच्या सुरक्षेला फार मोठी आव्हाने मिळत आहेत. या काळात भारत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर इतर देशांवर विसंबून राहू शकत नाही. देशाच्या शत्रूंनी संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांची निर्मिती त्यांच्या देशातच सुरू केलेली आहे. या आघाडीवर ते भारतापेक्षा काही प्रमाणात पुढे आहेत, असे लष्करप्रमुखांनी बजावले.

म्हणूनच संरक्षणच्या आघाडीवर देशाने स्वावलंबी बनणे अत्यावश्यक ठरते. संघर्षाच्या काळात ही बाब खूपच महत्त्वाची ठरेल, असा संदेश लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी दिला. देशाच्या लष्कराला दहशतवाद व नक्षलवादाच्या आघाडीवर गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आखले जात आहे, याकडेही लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले असून हा अपारंपरिक युद्धाचा भाग ठरतो, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर देश आत्मनिर्भर बनावा यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली होती. यानुसार काही महत्त्वाची साधने व उपकरणे यांची देशांतर्गत निर्मिती केली जाईल व त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. इतकेच नाही तर देशात निर्मिती झालेली शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न केले जातील आणि ही प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. गुरुवारी पार पडलेल्या परिसंवादतही लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी संरक्षणविषयक तंत्रज्ञानाचा देशांतर्गत विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले. सध्या लष्करासाठी आवश्यक असलेल्या साहित्य व शस्त्रास्त्रे यांच्या दीड लाख कोट रुपयांच्या मागणीपैकी सुमारे ७५ टक्के इतकी मागणी ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत पूर्ण केली जात आहे, असा दावा लष्करप्रमुखांनी केला.

leave a reply