बायडेन प्रशासनाच्या ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’च्या घोषणेनंतर अमेरिका व युरोपातील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण

घसरण

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा खुले करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीव्र पडसाद उमटले आहेत. गुरुवारी अमेरिका व युरोपच्या शेअरबाजारांमध्ये दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या घसरणीचे परिणाम शुक्रवारी आशियाई शेअरबाजारांमध्ये दिसून आले असून जपान, चीन व हॉंगकॉंगच्या शेअरबाजाराला धक्के बसले आहेत. कच्च्या तेलाचे दरही प्रति बॅरल १०५ डॉलर्सच्या खाली आले आहेत.

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा खुले करण्याचा निर्णय जाहीर केला. अमेरिकेतील वाढती महागाई कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बायडेन यांनी सांगितले. मात्र या निर्णयावर अमेरिकेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेतील सत्ताधारी पक्ष व समर्थकांनी याचे स्वागत करून यामुळे अमेरिकी जनतेवरील भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र उद्योगक्षेत्र व गुंतवणुकदारांमधून नाराजीचे सूर उमटले असून त्याचे गुरुवारी शेअरबाजारात पहायला मिळाले.

घसरण

अमेरिकेतील आघाडीच्या शेअर निर्देशांकांपैकी एक ‘एसऍण्डपी ५००’ १.६ टक्क्यांनी खाली आला. ‘डो जोन्स’ निर्देशांक ५५० अंशांनी घसरला असून ‘नॅस्डॅक कम्पोझिट’ला दीड टक्क्यांचा फटका बसला. युरोपच्या ‘स्टॉक्स ६००’ एक टक्क्याने घसरल्याचे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील समभागांची नोंद ठेवणार्‍या ‘एमएससीआय वर्ल्ड इक्विटी इंडेक्स’मध्येही १.३ टक्क्यांची घसरण दिसून आली. अमेरिका तसेच युरोपातील शेअरबाजारांमध्ये झालेल्या घसरणीमुळे या निर्देशांकांना तिमाहितील सर्वात मोठे नुकसान सहन करावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी अमेरिका व युरोपच्या शेअरबाजारातील घसरणीचे परिणाम शुक्रवारी आशियाई शेअरबाजारांमध्ये दिसून आले. जपान, चीन व हॉंगकॉंग या तिन्ही शेअरबाजारांमध्ये घसरण झाली आहे. हॉंगकॉंगचा शेअरनिर्देशांक एक टक्क्यांहून अधिक खाली आला. या घसरणीमागे ‘बँक ऑफ जपान’चे नवे सर्वेक्षणही कारणीभूत ठरल्याचे समोर आले. या सर्वेक्षणात जपानी उद्योगक्षेत्रात नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

leave a reply