रशियाच्या ‘रुबल डेडलाईन’च्या पार्श्‍वभूमीवर जर्मनी व ऑस्ट्रियाकडून ‘गॅस इमर्जन्सी प्लॅन’ची घोषणा

‘गॅस इमर्जन्सी प्लॅन’बर्लिन/व्हिएन्ना/मॉस्कोे – रशियावर निर्बंध लादणार्‍या देशांनी रशियन इंधनाची देणी रुबल चलनात चुकती करावीत, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यासंदर्भातील आदेशही जारी केला आहे. या निर्णयाला विरोध करणार्‍या देशांचा इंधनपुरवठा रशिया बंद करेल, या भीतीने युरोपिय देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जर्मनी व ऑस्ट्रिया या दोन्ही प्रमुख देशांनी आपत्कालिन योजनेचा भाग असलेला ‘गॅस इमर्जन्सी प्लॅन’ सक्रिय केल्याचे जाहीर केले आहे.

युरोपिय देशांमध्ये आयात होणार्‍या इंधनापैकी ३० टक्क्यांहून अधिक इंधन रशियातून येते. यात नैसर्गिक इंधनवायू कच्चे तेल तसेच कोळशाचाही समावेश आहे. रशियन इंधनावर इतक्या मोठ्या प्रमाणात अवलंबून असतानाही युरोपिय महासंघाने रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत. त्यात रशियाची मध्यवर्ती बँक, परकीय गंगाजळी, स्विफ्ट यंत्रणेतून होणारे व्यवहार, रशियन बँका व रशियन उद्योजक यांचा समावेश आहे. पाश्‍चिमात्य देशांच्या या निर्बंधांना रशियानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून इंधनाची देणी रुबलमध्ये चुकती करण्याचा निर्णय त्याचाच भाग मानला जातो.

‘गॅस इमर्जन्सी प्लॅन’रशियाच्या या निर्णयाला युरोपिय देशांनी जोरदार विरोध केला असून हा एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या निर्णयाचे पालन न करण्याचा इशारा युरोपिय देशांनी दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना रशियाने आपण कोणत्याही देशाला फुकट इंधन देणार नाही, असे बजावले आहे. त्यामुळे रशियन इंधनाचा वाद चिघळू लागल्याचे संकेत मिळाले आहेत. रशिया युरोपिय देशांचा इंधनपुरवठा बंद करू शकतो, असे संकेत रशियन अधिकारी तसेच माध्यमांकडून देण्यात येत आहेत.

त्यामुळे युरोपिय देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रशियन इंधनावर अवलंबून असणार्‍या देशांनी आपत्कालिन योजनांच्या कार्यवाहीची तयारी सुरू केली आहे. जर्मनी व त्यापाठोपाठ ऑस्ट्रियाने ‘गॅस इमर्जन्सी प्लॅन’ सक्रिय केल्याची घोषणा करणे त्याचाच भाग ठरतो. जर्मनीने आपल्या नागरिकांसह उद्योगक्षेत्राला इंधनाचे ‘रेशनिंग’ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाकडून होणारा इंधनपुरवठा बंद झाल्यास त्याचा पहिला व सर्वात मोठा फटका जर्मन उद्योगांना बसेल, असेही सांगण्यात आले आहे. जर्मनीच्या उद्योगक्षेत्राने याबाबत इशाराही दिला असून उद्योगक्षेत्र ठप्प होऊन अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल, असे बजावले आहे. ऑस्ट्रियाने इंधनबाजारपेठेतील नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

बल्गेरियाने इंधन साठवणुकीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इटली व ग्रीसने आपत्कालिन बैठक आयोजित केली असून रशियन इंधनपुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply