इस्रायलच्या लष्करी कारवाईनेच इराणचा अणुकार्यक्रम रोखता येईल

- अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम

अणुकार्यक्रमवॉशिंग्टन – ‘निर्बंध लादून इराणच्या अणुकार्यक्रमाची गती कमी करता येईल. पण अणुकार्यक्रम रोखता येणार नाही. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखायचे असेल तर त्यासाठी इस्रायलची लष्करी कारवाई आवश्यक आहे’, असे अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सुचविले. ‘इराण अणुबॉम्बनिर्मिती करीत आहे, हे कुठलाही आंधळा, बहिरा, मुका नसलेला कुणीही सांगू शकतो. असे असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे १९३७ सालच्या ऑशवित्झच्या कटाकडे दुर्लक्ष करणसारखे ठरेल’, असा इशारा देऊन ग्रॅहम यांनी बायडेन प्रशासनावर टीकास्त्र सोडले.

१९३७ साली नाझी जर्मनीने पोलंडच्या ऑशवित्झ येथे छळछावण्या उभारून त्यामध्ये ज्यूधर्मियांना डांबण्यास सुरुवात केली होती. पण नाझी जर्मनीकडून ज्यूधर्मियांवर सुरू असलेल्या या अत्याचाराकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, याची आठवण ग्रॅहम यांनी करून दिली. इराणबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत असलेले बायडेन प्रशासन देखील दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप ग्रॅहम यांनी केला.

अणुकार्यक्रमइराण अणुबॉम्बनिर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला आहे, हे आंधळा, बहिरा, मुका नसलेला कुणीही सांगू शकतो. तरीही बायडेन प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ग्रॅहम यांनी ठेवला. असे करून बायडेन प्रशासन इस्रायलविरोधात सुरू असलेल्या कारस्थानांकडे कानाडोळा करीत असल्याची टीका ग्रॅहम यांनी केली. त्याचबरोबर अणुकरार करून इराणचा अणुकार्यक्रम रोखता येणार नसल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटरनी इस्रायली माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला.

इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असल्याचे ग्रॅहम यांनी सांगितले. यामध्ये इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादून दडपण वाढविणे, या पहिल्या पर्यायाचा समावेश असल्याचे ग्रॅहम यांनी सुचविले. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाचे समर्थन करणारी आयातुल्ला खामेनी यांची राजवट उलथून टाकण्याचा दुसरा पर्याय ग्रॅहम यांनी सांगितले. यासाठी इराणी जनतेनेच खामेनी यांची राजवट उलथण्याची आवश्यकता असल्याचे ग्रॅहम म्हणाले. पण इराणच्या जनतेकडून खामेनी राजवटीविरोधात बंड शक्य नसल्याचे गॅ्रहम यांनी मान्य केले.

अशा परिस्थितीत, इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी शेवटचा एकच पर्याय शिल्लक राहतो, याकडे ग्रॅहम यांनी लक्ष्य वेधले. इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ले चढविले तरच इराणची अण्वस्त्रनिर्मिती रोखता येऊ शकते, असा दावा ग्रॅहम यांनी केला. इस्रायलच्या या कारवाईला आपले पूर्ण समर्थन असल्याचे ग्रॅहम म्हणाले. अमेरिकेतील लोकप्रतिनिधींचा मोठा गट सध्या बायडेन प्रशासनाने व्हिएन्ना येथे सुरू केलेल्या वाटाघाटींच्या विरोधात आहे. अवघ्या काही आठवड्यांच्या मुदतीत इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, असे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींचे तसेच इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. असे असले तरी बायडेन प्रशासन इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम आहेत.

leave a reply