पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत झाल्याने अत्यावश्यक सेवा बंद पडण्याची भीती – उपग्रह, विमान व मोबाईल सेवा प्रभावित होतील असा वैज्ञानिकांचा इशारा

पॅरिस – पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत असून त्यामुळे उपग्रह, विमाने तसेच मोबाईल सेवा बंद पडण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. चुंबकीय क्षेत्र अर्थात ‘मॅग्नेटिक फिल्ड’ अधिक कमकुवत झाल्यास पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव आपली जागा बदलू शकतात; या बदलाचा मोठा परिणाम पृथ्वीवरील वातावरण आणि सजीवसृष्टीवर होऊ शकतो. अडीच लाख वर्षातून एकदा पृथ्वीवर अशा प्रकारचा बदल घडतो, अशी माहिती ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या वैज्ञानिकांनी दिली.

‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने अंतराळात पाठवलेल्या ‘स्वार्म’ प्रकारातील उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे चुंबकिय क्षेत्राबाबतचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या दोन खंडांमध्ये असलेल्या भागातील चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे. वैज्ञानिकांनी याला ‘साऊथ अटलांटिक ऍनामॉली’ असे नाव दिले असून चुंबकीय क्षेत्र कमकुवत होणाऱ्या भागाची व्याप्ती गेल्या काही वर्षात वाढत असल्याचे म्हटले आहे. चुंबकीय क्षेत्राची क्षमता २४ हजार ‘नॅनोटेस्लाज’वरून २२ हजार ‘नॅनोटेस्लाज’पर्यंत कमी झाल्याचे ‘स्वार्म’ उपग्रहांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

या प्रक्रियेमागचे कारण अद्याप कळले नसले तरी पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांच्या स्थितीत होणारा बदल हीच सर्वात मोठी शक्यता असावी, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पृथ्वीवरील दोन्ही ध्रुवांनी आपली जागा बदलण्याच्या प्रकाराला ‘जिओमॅग्नेटिक रिव्हर्सल’ असे म्हटले जाते. यासाठी पृथ्वीचा गाभा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘आयर्न अर्थ कोअर’मधील हालचाली कारणीभूत असतात.

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र संपूर्ण सजीवसृष्टीसाठी एखाद्या संरक्षक ढालीप्रमाणे कार्य करते. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यकिरणांमधून होणार्‍या हानिकारक किरणोत्सर्गापासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण होते. त्याचवेळी अंतराळात वाहणारे वारे आणि इतर गोष्टींपासूनही पृथ्वीचा बचाव होतो. त्यामुळे सध्या होणारे बदल चिंताजनक असल्याचे मत युरोपियन वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.

पृथ्वीवरील दोन्ही ध्रुवांनी आपली जागा बदलल्यास अवकाशात फिरणारे उपग्रह व अंतराळयाने बंद पडू शकतात. याचा मोठा परिणाम जगभरातील संपर्क यंत्रणा तसेच हवाई सेवेवर होऊ शकतो व त्या दोन्ही ठप्प होऊ शकतात. चुंबकीय क्षेत्र क्षीण होण्यामागे पृथ्वीच्या गाभ्यात अर्थात ‘अर्थ कोअर’मध्ये नक्की काय बदल होत आहेत हे समजून घेण्याचे आव्हान आता संशोधकांच्या समोर आहे, असे मत ‘जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेस’चे संशोधक जुर्गन मॅट्स्का यांनी व्यक्त केले आहे.

leave a reply