भारताकडून लडाखमधील सैन्य तैनातीत वाढ

नवी दिल्ली/लेह – लडाखमध्ये गलवान नदीच्या खोऱ्यामध्ये भारताने अतिरिक्त सैनिकांची तैनाती केली आहे. चीनने ‘सिनियर कर्नल’ पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पाच हजार जवानांची पलटण सीमा भागात तैनात केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर भारतानेही येथील आपली सैन्य तैनाती वाढविली आहे. चीन इतकेच आपलेही अतिरिक्त सैनिक या सीमेवर तैनात करून भारताने चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

शुक्रवारी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लडाखला भेट देऊन येथील सज्जतेचा आढावा घेतला होता. त्यानंतर भारताने चीनला लागून असलेल्या लडाखच्या भागांमध्ये सैन्य तैनाती वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. १९६२ च्या युद्धाआधी चिनी जवानांनी ज्या भागात तंबू ठोकले होते, त्या गलवान नदी किनारी चार ठिकाणी आणि पॅंगोग सरोवर क्षेत्रात एका ठिकाणी चीनने आपल्या जवानांची तैनाती वाढविली आहे. गलवानच्या खोऱ्यात चिनी जवानांनी तंबू ठोकले असून मोठ्या प्रमाणावर बंकर बांधण्यासाठी अवजड उपकरणेही आणून ठेवली आहेत.

वरिष्ठ कर्नल पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चीनने पाच हजार जवानांची पलटणच येथे तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत. चिनी लष्करात ‘सिनियर कर्नल’ पद हे भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरच्या बरोबरीचे असून इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली येथे जवानांची तैनाती वाढवून चीन भारतावर दडपण वाढवू पाहत आहे. मात्र यानंतर भारताने इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांची तैनाती वाढविली आहे.

चीनच्या लडाखला लागून असलेल्या सीमा क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासूनच हालचाली वाढल्या होत्या. घुसखोरीच्या घटना वाढल्या होत्या. भारतीय लष्कराने हे सारे प्रयत्न हाणून पाडले. मात्र ५ मे रोजी पॅंगोगमध्ये दोन्ही देशांच्या सुमारे २५० सैनिकांनामध्ये झालेल्या जोरदार झटापटीनंतर येथील तणाव वाढला. चीनने या भागात वाढविलेली तैनाती पाहता २०१७ सालच्या डोकलामप्रमाणे दीर्घकालीन संघर्षांची तयारी केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लडाखमध्ये चीन आणि भारतामध्ये ८०० किलोमीटरची सीमारेषा आहे. येथील पॅंगोग सरोवर, चुमार, डेमचॉक आणि दौलत बेग ओल्डीमध्ये दोन ठिकाणी चिनी सैनिकांकडून नेहमी घुसखोरीचे प्रयत्न होतात. मात्र प्रथमच गलवानचे खोऱ्यात चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न झाला. येथे रस्ते आणि पायभूत सुविधांच्या विकासाला भारताने दिलेल्या वेगामुळॆ चीन अस्वस्थ झाला असून ही बांधकामे थांबविण्यासाठी चीन दडपण वाढवू पाहत असल्याचे विश्लेषकांचा दावा आहे.

leave a reply