संबंध सुधारण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष सौदीच्या दौऱ्यावर

तुर्कीचे राष्ट्राध्यक्षजेद्दा – गेल्या चार वर्षांपासून सौदी अरेबियाबरोबरचे बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन सौदीमध्ये दाखल झाले. जमाल खशोगी हत्याप्रकरणावरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले मतभेद मिटविण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्न करणार असल्याचा दावा केला जातो. तर मुस्लिम ब्रदरहूड आणि इतर दहशतवादी संघटनांना तुर्कीचे मिळणारे समर्थन यावर सौदी बोट ठेवणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या तुर्कीने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या परराष्ट्र धोरणात ‘यु टर्न’ घेतला आहे. याआधी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन कट्टरवादसमर्थक भूमिका स्वीकारुन इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याची तयारी केली होती. यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सौदी अरेबिया, युएई, इजिप्त या देशांच्या नेतृत्वावर टीका केली होती. तसेच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी इराण, पाकिस्तान व मलेशियासह स्वतंत्र गटाची स्थापना केली होती.

सौदीबरोबरच्या तुर्कीच्या बिघडलेल्या संबंधासाठी जमाल खशोगीची हत्या देखील कारण ठरते. २०१८ साली तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पत्रकार जमाल खशोगीची हत्या झाली. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना जबाबदार धरून सौदीवर गंभीर आरोप केले होते. क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याशी संबंधित व्यक्ती व अधिकारी खशोगीच्या हत्येत सहभागी असल्याचा ठपका तुर्कीने ठेवला होता. पण गेले वर्षभर तुर्कीची अर्थव्यवस्था खालावल्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्षराष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना आपली कट्टरवादी भूमिका सोडून द्यावी लागली.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सौदीशी जुळवून घेण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. गुरुवारी सौदीचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याची घोषणा केली. या नव्याने प्रस्थापित होत असलेल्या सहकार्यात राजकीय, लष्करी, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

सौदीच्या जेद्दामध्ये दाखल झालेल्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सौदीचे राजे सलमान आणि त्यानंतर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा गळाभेटीचा फोटो आखाती माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. याद्वारे तुर्की व सौदीमध्ये मतभेद उरले नसल्याचे संकेत दिले जात असल्याचे आखाती विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच या दौऱ्यातून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन सौदीकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास तुर्कीची माध्यमे व्यक्त करीतआहेत.

leave a reply