तालिबानच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी अफगाणींची पासपोर्ट मिळविण्यासाठी जीवघेणी धडपड

काबुल – शनिवारी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने पासपोर्ट जारी करण्याची घोषणा केली. त्याबरोबर तालिबानच्या कचाट्यातून निसटण्यासाठी शेकडो अफगाणींनी पासपोर्टसाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. या गर्दीचा लाभ घेऊन तालिबानविरोधी दहशतवादी घातपात माजवू शकतात. पण हा धोका पत्करूनही अफगाणी पासपोर्ट मिळवून हा देश सोडण्यासाठी धडपडत आहेत. ही बाब अफगाणिस्तानच्या जनतेचा तालिबानवरील तसेच या देशाच्या भवितव्यावरील विश्‍वास उडाल्याचे दाखवून देते.

तालिबानच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी अफगाणींची पासपोर्ट मिळविण्यासाठी जीवघेणी धडपडऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हजारो अफगाणी नागरिक हा देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते. यामुळे काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच अफगाणिस्तानच्या सीमेवरील अफगाणींची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली होती. वीस वर्षानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर आलेल्या तालिबानकडून अपेक्षा नसलेले अफगाणी पासपोर्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण तालिबानने पासपोर्ट कार्यालयाची सेवा बंद केल्यानंतर हजारो अफगाणींची निराशा झाली होती.

मात्र शनिवारी तालिबानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने राजधानी काबुलमधील पासपोर्ट कार्यालयाची सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा अफगाणींनी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली आहे. काही अफगाणींनी वैद्यकीय कारणे देऊन देशातून बाहेर पडण्यासाठी अर्ज केला आहे. तर काही अफगाणी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर उघडपणे तालिबानच्या कचाट्यातून निसटण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची कबुली दिली. काबुल कार्यालयाबाहेर जमलेल्या अफगाणींच्या या गर्दीवर नियंत्रण ठेवणे तालिबानसाठी अवघड बनले आहे.

तालिबानच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी अफगाणींची पासपोर्ट मिळविण्यासाठी जीवघेणी धडपडया गर्दीचा फायदा घेऊन तालिबानविरोधी आयएस-खोरासनचे दहशतवादी आत्मघाती हल्ला किंवा स्फोट घडवू शकतात, असा इशारा तालिबानचे नेते आंतरराष्ट्रीय माध्यमांना सांगत आहेत. तसेच अफगाणी नागरिक सहकार्य करीत नसल्याची टीका तालिबानचे नेते करीत आहेत. पण पासपोर्ट मिळविणे आपल्यासाठी महत्त्वाचे असून यासाठी आपल्याला जीवाचीही पर्वा नसल्याचे अफगाणी तरुणांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील आपली राजवट अफगाणी जनतेच्या विश्‍वासावर आधारलेली असल्याचा दावा तालिबानने ऑगस्ट महिन्यात केला होता. अफगाणी महिलांनी आपल्या राजवटीच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणी तसेच पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. पण अफगाणिस्तानच्या जनतेचा तालिबानवर विश्‍वास उरलेला नसल्याचे पासपोर्टसाठी लागलेल्या रांगांमुळे उघड होत आहे.

leave a reply